Thursday, 3 January 2019

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

- भास्कर भोजने

     सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर करून सत्ता हस्तगत करणे हा मनुवादी पॅटर्न आहे...!
    साम ,दाम, दंड, भेद यापैकी भेद या अस्त्राचा वापर मनुवादी कसे करीत आलेले आहेत त्याची उजळणी करु या आणि आजच्या परिस्थितीत  मनुवादी मंडळीचा मनसुबा समजून घेऊ या....!
       प्रतिक्रांतीवाद्यांनी आधुनिक काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कांऊटर करण्यासाठी सर्वात पहिला अटॅक केला होता लंडन येथील गोलमेज परिषदेत,म. गांधी म्हणाले होते की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी नाहीत तर मीच खरा दलितांचा कैवारी आहे....!
    जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या हक्कांसाठी लढा द्यायला उभे राहिले तेव्हा ख-या प्रतिनिधीला बाजूला सारून बुजगावणे उभे करणे हा मनुवादी अजेंडा आहे,त्याचाच हा प्रकार.परंतु भोळ्या भाबड्या आणि अशिक्षित जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनला तारा पाठविल्या आणि आपला खरा नेता कोण हे इंग्रजांच्या लक्षात आणून दिले...!
     म्हणूनच दलित, समुहासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जातियनिवाडा मिळवू शकले....!
    तेव्हा पासून सच्चा आंबेडकरवादी नेता आंबेडकरी जनतेला मिळू नये म्हणून संभ्रम निर्माण करण्यासाठी मनुवादी,नेहमी नेतृत्व म्हणून बुजगावणे उभे करीत आले आहेत....!
   आता आपली म्हणजे, आंबेडकरवादी,संविधानवादी, मानवतावादी, समाजवादी विचारांच्या मंडळीची जबाबदारी आहे की,खरा आणि मनुवाद्यांनी लादलेला नेता यातील फरक समजून घेणे आणि खरा संविधानवादी नेता निवडणे....!
     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिप्लेस करुन जगजीवनराम सारखे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने केला आणि अनु.जातीला एकसंघ आलें नाहीं पाहिजे म्हणून भेद नितीचा अवलंब केला...!
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें नंतर रिपब्लिकन पक्षाचे सत्तेकडे जाण्याचे वा प्रबळ विरोधी पक्षाचे उद्दिष्ट साध्य होऊ नये म्हणून, मनुवादी मंडळीने १९६७ मध्यें ऊत्तर प्रदेशात सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते संघप्रिय गौतम आणि बी.पी.मौर्य यांच्या पैकी बी.पी.मौर्य यांना रिपब्लिकन पक्षातुन फोडले आणि मंत्रीपद दिले व रिपब्लिकन पक्ष गारद केला...!
महाराष्ट्रात कर्तबगार रिपब्लिकन नेतृत्व म्हणून दादासाहेब गायकवाड तयार झाले तेव्हा रा.सु. गवई सारख्या एका व्यक्तीला सर्वच काही देऊन कॉंग्रेस पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे लाचार बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्ष नेस्तनाबूत केला...!
    तोच पायंडा पुढेही मनुवादी कॉंग्रेस पक्षाने सुरु ठेवला, जेव्हा १९८० च्या दशकात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचें नेतृत्व उभे राहिले तेव्हा शरद पवारांनी रामदास आठवले हे बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भेद नितीचा अवलंब केला आहे...!
    रिपब्लिकन चळवळीला मनुवादी मिडियाने लादलेले नेते म्हणून अनेक जण तयार केले आणि सत्तेची चटक लावली.ही सुरुवात कॉंग्रेस पक्षाने केली आहे ,सत्तेच्या मोहापायी, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे,चंद्रकात हंडोरे, नितिन राऊत, मुकुल वासनिक, दादासाहेब रुपवते,एन.एम.कांबळे, बाळकृष्ण वासनिक,नाशिकराव तिरपुडे आणि असेच काही जण...!
   हे नेते नव्ह्ते तर कॉंग्रेस किंवा मनुवादी मंडळीने तयार केलेले बुजगावणे होते...!
    एका बाजुने सत्तेची चटक लावली तर दुस-या बाजूने क्रांतीवादी विचारांच्या पक्षाला भेद नितीने सुरुंग लावला होता...!
    काल कॉंग्रेस पक्ष मनुवादी विचाराचे कार्य करीत होता आज पक्षाचे नांव बदलले आहे.कॉग्रेसची जागा भाजपाने घेतली आहे...!
   कॉंग्रेस असो की, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजप असो की, शिवसेना एकाच ध्येयाने ते क्रांतीवादी विचारांच्या पक्षांना परास्त करण्यासाठी झटतात...!
    आता नवे भिडू बुजगावणे म्हणून तयार केले जातं आहेत...!
    मिडिया अगोदर असा बनाव तयार करते की,अमुक एक तरुण विचाराने सच्चा आंबेडकरवादी आहे आणि मग त्याला नेता म्हणून प्रपोज केले जाते...!
      चंद्रशेखर आझाद(रावण) हा तरुण ऊत्तर प्रदेशात त्याचे सामाजिक कार्य आहे...!
   तो नेमका महाराष्ट्रात काय करतो आहे आणि तेही निवडणूका जवळ आल्या असता...??
     आंबेडकरी तरुणाला आणि ऊत्तर प्रदेशातील तरुणाला महाराष्ट्रात मिडिया एवढी कव्हरेज का देतं आहे...??
   आता निवडणुका जवळ आल्या असता मनुवादी षंढयत्र रचुन आपलं इशिप्त साध्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत...!
   चंद्रशेखर आझाद (रावण) हा लादलेला नेता मनुवादी आपल्यावर लादतं असतील आणि नवं बुजगावणे तयार करीत असतील तर आमची जबाबदारी ही मोठी आहे...!
    मनुवादी भेद नितीचा पाडाव करण्यासाठी जुना अनुभव लक्षात घेऊन आमची तयारी अशी असली पाहिजे की,ज्याला मनुवादी मिडिया जास्त कव्हरेज देते आहे तो मनुवादी आहे,बूजगावणे आहे हे चटकन लक्षात घेतले पाहिजे...!
     आत्ता यापुढे नवे नवे भिडू तयार करुन बुजगावणे आमच्या समोर मांडल्या जातील...!
   बुजगावणे भिरकावून लावण्याची कुवतं निर्माण करु या...!
   आमच्या अल्पशिक्षित आणि भोळ्या महारांनी १९३२ साली लंडनला तारा पाठवून म.गांधी हा आमचा नेता नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे नेते आहेत असा खंबीरपणा आणि बौद्धिक हुशारी दाखविली व भविष्य सुरक्षित केले....!
   आत्ताही तशीच बौद्धिक हुशारी आणि क्रांतीदर्शी विचाराने मनुवादी भेदनितीचा पाडाव करायचा आहे....!
   भाजपने बूजगावणे तयार करुन निवडणुकीत संभ्रम निर्माण करणं सुरू केलं आहे... सावधान.
    या भाजपच्या भेदनितीचा पाडाव करु,तसेच याचं नितीचा वापर करून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काही मोहरे वापरुन आपल्यावर चालं करु शकते ढोंगी सेक्युलॅरिझमचे सोंगाडे काहीही करु शकतात म्हणून अखंड सावधान राहून निवडणूकीला सामोरे जाऊ या....जय वंचित बहूजन आघाडी.
  जयभीम.

-भास्कर भोजने.

...अन पालवे ताईंना गहिवरून आले !

...अन पालवे ताईंना गहिवरून आले !
- जितरत्न पटाईत
नगर जिल्ह्यातील पाथर्डी रोडवर गुरुदेव नावाचे हॉटेल आहे. येथे जेवणासाठी आम्ही सर्वजण थांबलो. हॉटेलच्या काउंटरवर बसलेली महिला या गावाच्या माजी सरपंच व त्या हॉटेलच्या 'मालकीण' आहेत. हॉटेलच्या समोरच संत भगवान बाबा यांची मोठी फ्रेम लक्ष वेधून घेत होती.
आम्ही सर्व जेवायला थांबलो असताना त्या महिला जरा गोंधळल्या होत्या. कारण, समोर #ऍड. प्रकाश आंबेडकर होते. त्यांनी न राहवून बाळासाहेब आंबेडकर यांना विचारले की, तुम्ही प्रकाश आंबेडकर का ? बाळासाहेबांनी हो म्हटल्यावर त्या खूप खुश झाल्या आणि स्वतः किचनमध्ये जाऊन त्यांनी स्वयंपाक केला व आम्हा सर्वांना भरपेट खाऊ घातले. ( त्यांनी बनवलेली काजू करी लाजवाब होती..) त्या महिला सरपंचाचे नाव क्षेत्रे ताई आहे. क्षेत्रे ताईंनी गावातीलच सध्या सरपंच असलेल्या सानप ताई यांना बोलवून घेतले.
क्षेत्रे ताईंनी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य व पुढील पाच वर्ष गावाच्या सरपंच म्हणून काम केले आहे.
क्षेत्रे आणि सानप ताईंनी आपण सरपंच झाल्यावर गावात काय विकास केला याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
सरतेशेवटी त्या म्हणाल्या की, आम्ही ( क्षेत्रे आणि सानप ताई ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिश्रमामुळे 'सरपंच' झालो. आमच्या सारख्या 'वंजारी' समाजातील दोन-दोन महिला सरपंचपद भूषवताय ही बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई आहे.
हा बदल आणि एवढी ऊर्जा ही मला प्रचंड आश्वासक वाटली. क्षेत्रे ताईंनी आपल्या मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवले आहे.. त्या महिला सलगपणे भरभरून बोलत होत्या आणि #बाळासाहेब आंबेडकर हे सर्व शांतपणे ऐकत होते.
सानप ताई येतानाच फेटा आणि शाल घेऊन आल्या होत्या. जाता-जाता त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा आवर्जुन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन निरोप घेतला...
आम्ही मात्र, स्तब्ध होऊन सानप ताईंकडे एकटक बघत होतो....
- जितरत्न पटाईत


Wednesday, 2 January 2019

शांतीदुताच्या भुमिकेत बाळासाहेब आंबेडकर...!

शांतीदुताच्या भुमिकेत बाळासाहेब आंबेडकर...!

- भास्कर भोजने

       सत्ताधारी वर्ग सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद या अस्त्रांचा वापर करीत असतो...!
  यापैकी दंड देणें हे अस्त्र वापरतांना आपल्या देशात जातीय दंगली वा धार्मिक दंगली पेटवून अल्पसंख्याक समुहाला दंड देण्याची जणू काही रितचं बनली आहे...!
     महाराष्ट्रात आंबेडकरी समुहाला दंड देण्यासाठी इथल्या प्रतिक्रांतीवाद्यांनी नेहमी जातीय दंगली पेटवून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे...!
      या दंड देण्याच्या अस्त्राचा परिणाम इतका भयावह असतो की,मानवता कलंकित होते.,मनुष्यत्व हिनवलं जातं., कित्येक आयुष्ये बरबाद होतात.,अब्रू वेशीवर टांगली जाते., तरुणांच्या पिढ्या बरबाद होतात., आर्थिक दारिद्रय पदरात येते आणि मग मना-मनात भिती,भयग्रस्तता ठाण मांडून बसते.आणि म्हणूनचं मग लाचारी पत्करण्या शिवाय पर्याय शिल्लक राहतं नाही...!
     अशा लाचार समुहाला पाहिजे तसं वापरुन घेता येते.आणि सत्ता राबविता येते.असा हा प्रयोग आहे...!
      अशा अल्पसंख्याक समुहाचे नेतृत्व करणे सहज सोपी बाब नाही...!
या समुहाच्या नेतृत्वाला प्रतिक्रांतीवाद्यांचे मनसुबे ओळखुन समाजाला दंड या अस्त्रा पासुन वाचविण्यासाठी अतिशय उच्च कोटिचे बौद्धिक कौशल्य वापरावे लागते...!
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नंतर आंबेडकरी समुहासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका घेऊन आपले नेतृत्व कसोटीवर घासून सिद्ध केले आहे...!
    अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक जीवनाला १९८० पासुन सुरुवात केली आहे. तेव्हा पासून वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी समुहासाठी शातीदुताची भुमिका घेऊन आंबेडकरी समुहाला दंड या अस्त्राची शिकार होऊ दिले नाही...!
१) १९७६ मध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांनी नामांतराचा प्रश्न ऊभा केला आणि तो प्रश्न कॉंग्रेस पक्षाने चिघडविला म्हणून नामांतराचे आंदोलन उभे राहिले.हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या मार्फत प्रचंड दडपशाही करण्यात आली.आंबेडकरी चळवळीला मुळासकट उखडून टाकण्याचाही प्रयत्न त्यावेळी झाला.त्यासाठी शिवसेनेसारख्या जातीयवादी संघटनांना सोबतं घेऊन आंबेडकरी समुहाला एकांगी पाडण्यात आले होते.त्या आंदोलनात आंबेडकरी समुहाचे अपरिमीत नुकसान झाले.त्यावेळी त्या परिस्थितीला बदलणे, शांतता प्रस्थापित करणे महत्त्वाचे होते...!
  अशावेळी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याचा दौरा केला, मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडणं मिटविणे, सामंजस्य निर्माण करणे,यासारखी कामे केली आणि शांतीदुताची भुमिका निभावली...!
    नामांतराच्या आंदोलनात मनातुन खचलेल्या आंबेडकरी समुहाला नैतिक बळ देण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८३ साली नाशिक ते मुंबई हा २ मार्च ते ८ मार्च असा लाॅंगमार्च काढला आणि खचलेल्या समुहाला भयग्रस्त अवस्थेतून बाहेर काढण्याची भुमिका निभावली...!
२) १९८७ साली रिडल्स इन हिंदूइझम या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथावरुन वातावरण पेटविण्यात आले...!
  शिवसेनेच्या बाळ ठाकरे यांनी मुंबई मध्ये धर्माचा आधार घेऊन चिथावणीखोर वक्तव्य करून आंबेडकरी समुह विरुद्ध हिंदू समुह अशी आग लावण्याचा प्रयत्न चालविला तेव्हा, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी, दिनांक ७ फेब्रुवारी १९८८ ला हुतात्मा चौकाला सामुदायिक अभिवादन करायचे असे फर्मान काढले.सगळेजण अवाक् झाले कारण परिस्थिती अतिशय स्फोटक होती.दुस-या दिवशी हुतात्मा स्तंभाला सामुदायिक अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला,ही बातमी मुंबईमध्ये वा-यासारखी पसरली आणि दंगली घडवायले सरसावलेले हात एकदम थप्प झाले...!
बाळासाहेब आंबेडकरांनी होणारी दंगल थांबविली,शांतीदुताची भुमिका निभावली...!
३) अॅड बाळासाहेब आंबेडकर अकोला जिल्ह्यात आलें तेव्हां अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समाजमन हे अस्वस्थ होते, कारणं अकोला जिल्ह्यत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते श्री.बलदेवराव म्हैसने पाटिल हे ग्रामीण भागात बलाची उपासना करण्यासाठी म्हणून आखाडे निर्माण करीत असतं परंतु ते ज्या गावात जात असतं त्या गावात बौद्ध विरुद्ध मराठा असा जातीय झगडा होतचं असे, त्यामुळे बलदेवराव पाटिल म्हणजे बौद्धांचा कर्दनकाळ असे ग्रामीण भागात समिकरणचं तयार झाले होते...!
   अशा अस्वस्थ समाज अवस्थेचा बाळासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास केला आणि १९९९ च्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत बलदेवराव पाटिल यांच्या पत्नी सौ.चित्रलेखाताई म्हैसने यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी व्याळा जि.प.सर्कलची उमेदवारी दिली त्यांना निवडून आणले आणि महिला व बालकल्याण सभापती बनविले, त्यामुळे जिल्ह्यातील बौद्ध आणि मराठा समाजात होणारे जातीय झगडे थांबले, शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाला, बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली...!
४) आत्ता २०१६ साली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मराठा लाख मराठा अशी हाक देऊन जातीयवादी वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले होते, त्यावेळी प्रतिमोर्चे काढून मराठ्यांना प्रतिऊत्तर देऊ अशी खेळी रचल्या गेली आणि मराठा विरुद्ध आंबेडकरी समुह अशी दंगल घडविण्याचा मनसुबा ठरला होता परंतु अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिमोर्चे नको ही भुमिका घेतली आणि बिघडणा-या परिस्थिती वर नियंत्रण मिळविले,शांतीदुताची भुमिका निभावली.होणारा अनर्थ टळला...!
५) कोपर्डी बलात्कार प्रकरणातही जातीय दंगल घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला त्याही वेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली आहे...!
६) नाशिक येथिल बौद्ध वस्तीवरील हल्ले,नगर येथील बौद्ध वस्तीवरील हल्ले आणि सातारा जिल्ह्यातील बौद्ध वस्तीवरील हल्ले यावेळी सुद्धा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका घेतली आणि होणारा अनर्थ टाळला...!
७) १ जानेवारी २०१८ चा भ्याड हल्ला .जर अॅड बाळासाहेब आंबेडकर भुमिका घेतं नाहीत तर प्रतिक्रांतीवादी निश्र्चितपणे आंबेडकरी समुहाला टार्गेट करुन पोलिसी अत्याचाराचा बळी केल्याशिवाय राहणार नव्हते.यावेळीही बाळासाहेब आंबेडकर यांनी शांतीदुताची भुमिका निभावली आहे आणि समाजाच्या होणा-या अपरिमित हानी ला थोपविले आहे...!
    असहिष्णूतेच्या काळात देशातील अल्पसंख्याक समुहाला टिकाव धरणेही कठीण कर्म असते अशा अस्वस्थ काळात अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी समुहाला ,संरक्षण तर देतचं आहेत परंतु त्याही पलिकडे आंबेडकरी समुहाच्या राजकीय सत्तेचे यशस्वी समिकरणंही मांडत आहेत...!
   जयभीम.
-भास्कर भोजने.

Sunday, 30 December 2018

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.

आधुनिक भारताचा पाया - भीमा कोरेगावची लढाई.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
जगाच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या, प्रत्येक लढाई ही राजकीय होती, दुसर्या राजाचा पराभव करुन त्याचे राज्यक्षेत्र आपल्या ताब्यात घ्यायचे अशीच चढाओढ असायची, काही ठिकाणी आपापल्या धार्मिक मान्यता लादण्यासाठीही काही लढाया झाल्याचे इतिहीसात नमुद आहेत, अनेक लुटुपुटुच्या लढायांनाही भारतीय इतिहासात गौरवाने सांगितल्या जातात.
मात्र जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात महत्वपुर्ण, विरतेने व स्वाभिमानी बाण्याने ओतप्रोत अशी फक्त ५०० आलुतेदार बलुतेदारांनी २८००० च्या विशाल जालिम पेशव्यांच्या सैन्याला एका रात्रीत कापुन काढुन एका देशाच्या प्रतिगामी इतिहासाला प्रगतीशील पुरोगामी राष्ट्राकडे घेऊन जाणारी कोरेगाव भीमा च्या पात्रात १ जानेवारी १८१८ ची लढाई जाणीवपुर्वक लपवली गेली होती.
हि लढाई दोन राज्यांमधील नव्हती, जमीनीवर ताबा मिळवण्यासाठी नव्हती तर ही लढाई होती "आम्ही माणुस आहोत व आम्हाला माणसा सारखे जगता यावे" या अधिकारा साठी.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या इतिहासाला एका ओळीत मांडताना सांगितले आहे की “भारत देशाचा इतिहास म्हणजे श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मन संस्कृतीचा झालेला संघर्ष आहे"
१) तथागत गौतम बुद्धांनी ब्राह्मण संस्कृतीवर पुर्ण विजय मिळवला व श्रमन संस्कृती देशात झपाट्याने पसरली, देवनामपिय महान सम्राट अशोकाने पुर्ण जगभरात तथागतांचे विचार पेरले, त्यानंतर प्रतिक्रांती झाली व देशात पुन्हा चातुर्वर्णाची ब्राह्मण संस्कृती जबरदस्तीने लादली गेली.
२) तथागतांची संस्कृती संत परंपरेने कायम जागृत ठेवली, तुकाराम महाराजांच्या सहाय्याने श्रमन / मातृ सत्ताक संस्कृती व स्वाभिमानाचे धडे आऊसाहेब राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिले व पुन्हा चातुर्वर्णाच्या शृंखला तोडण्याचे काम शिवरायांनी केले, त्यांनी सप्तबंदी धुडकावली व शुद्र समजल्या गेलेल्या सर्व नागवंशियांच्या हातात शस्त्र दिले व स्वराज्य / लोकशाही / गणराज्य स्थापन केले.
३) शिवशाही विरुद्ध पेशवे या लढाईत पेशव्यांनी शिवशाही संपवली, शिवशक बंद केला व शिवरायांच्या साथिदारांना गुलाम केले.
४) छ. शिवरायांना स्वराज्य स्थापनेत व स्वराज्य चालवण्यात ज्या ज्या जातीच्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना शुद्र म्हटले गेले, मराठा जातीच्या लोकांनाही पेशव्यांनी शुद्रच समजले याचे ज्वलंत उदाहरण आहे शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड या दोन महाराजांचे वेदोक्त प्रकरण.
५) पेशव्यांनी संभाजी महाराजांना कापुन टाकण्यात सहाय्य केले व ज्या महार गोविंद गायकवाड ने संभाजी महाराजांचे अंतिम संस्कार करुन पेशव्यांच्या धार्मिक फतव्याचा धुव्वा उडवला त्यामुळे पेशव्यांनी संपुर्ण महार जातीलाच बहिष्कृत केले, महार समाजावर अनेक अनिष्ट नियम लागु केले.
६) महारांनी बाजीराव पेशव्याकडे सर्व जुलमी नियम बंद करुन आम्हाला माणसासारखे जगण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी केली पन माजोरी सत्तेच्या मस्तीत धुंद असलेल्या बाजीरावाने ती मागणी धुडकावली, तेव्हा महार समाजाला या गुलामितुन मुक्त होण्याची संधी ब्रिटीश अधिकार्याने दिली. व जिवाची पर्वा न करता छ. संभाजी राजांचे अंत्यसंस्कार केले म्हणुन पेशव्यांनी लादलेली गुलामी संपवण्यासाठी महारांनी निश्चय केला व कोरेगाव भीमा ची लढाई लढली गेली, २८००० सैन्यांना फक्त ५०० लोकांनी पुर्णतः कापुन काढले व छ. संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला, शिवशाही संपवणार्या पेशव्यांचा खात्मा केला.
७) त्यानंतर ब्रिटीशांनी तेथे हा क्रांती स्तंभ बांधला,ब्रिटीशांनी पुन्हा या क्रांतीला मोठ्या क्रांतीत रुपांतरीत केले, ब्राह्मणी वर्चस्वाला ब्रिटीशांनी धक्का दिला व सर्व जाचक रुढी परंपरा बंद केल्या, सर्व शुद्रांना शिक्षण दिले पाहीजे अशी पुरोगामी भुमिका ब्रिटीशांनी घेतली, क्रांतीबा फुले, शाहु महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण प्रसारासाठी ब्रिटीशांनी सहाय्य केले व या देशाला आज ज्या पुरोगामित्व व प्रगतीशिलतेचा गर्व वाटतो ते सर्व काही ब्रिटीशांनी या देशाला दिले.
जर १ जानेवारी १८१८ चे ते युद्ध महार सैनिक हरले असते तर या देशातील स्त्री कधीच मुक्त झाली नसती, या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता,न्याय, शिक्षण या विषयावर समाजसुधारक निर्माण झाले नसते, या देशात आजही मनुस्मृती चे राज्य असते.
त्यामुळे क्रांतीबा फुलेंनी पहीली शाळा १ जानेवारी लाच सुरु केली, क्रांतीबांनी शिवरायांची समाधी शोधली, शाहु महाराजांनी मराठा समाजासह इतर समाजाला आरक्षण दिले, पेशव्यांनी बंद केलेला शिवशक पुन्हा सुरु केला, 
छ.शाहु महाराजांनी व सयाजी गायकवाड या ब्राह्मणी जुलमाचे शिकार झालेल्या महाराजांनी एका महाराच्या पोराला ( विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर)  शिक्षणासाठी मदत केली व त्याच महाराच्या पोराने या देशाला प्रबुद्ध भारताची वाट दाखवली,या देशाची सत्ता राजाच्या हातची काढुन लोकांच्या हातात दिली व देशातील प्रत्येक नागरिकाला राजा बनवले,
राज्याचा शेअर सर्वांना समान वाटला,
प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भिमा कोरेगाव लढाईच्या मजबुत पायावर फुले - शाहुंनी उभ्या केलेल्या समतेच्या मंदिरावर लोकशाहीचा कळस रचला व भारतातुन मनुस्मृतीचा कायदा संपवुन संविधान दिले.
५०० आलुतेदार बलुतेदार सैनिकांनी ( प्रामुख्याने महार जात  )
सुरु केलेला समतेच्या आधुनिक लढ्याला कायदेशिर स्वरुप देऊन बाबासाहेबांनी कोरेगाव भिमा च्या पायावर एक अधुनिक भारत निर्माण केला व आज आपन पहातोय भारत देश किती झपाट्याने प्रगती करुन जगात नावाजला गेला.
भिमा कोरेगाव चा तो  विजय स्तंभ छ. शिवराय, छ.संभाजी राजे यांच्या शुर व निष्ठावान मावळ्यांनी  लढलेल्या समतेच्या लढ्याचे प्रतिक आहे हे आता जगानेही मान्य केले आहे.
आजच्या आधुनिक भारताचा कळस जर भारतीय संविधान असेल तर याचा पाया निर्विवादपने ती कोरेगाव भिमाची लढाईच आहे, त्यामुळे २०१४ ला नवपेशवे सत्तेवर येताच पहिला हल्ला त्यांनी या स्तंभाला वंदन करायला आलेल्या आलुतेदार बलुतेदारांवरच केला. पन यावेळीही डॉ बाबासाहेबांचे रक्तच ( आद.प्रकाश आंबेडकर)  या पेशव्यांसमोर खंबीरपने उभे राहीले व पेशव्यांची पळता भुई थोडी केली आहे, ते राजकीय मार्गाने पुन्हा या देशाला ब्राह्मण संस्कृतीकडे लोटायचा प्रयत्न करत आहेत व बाळासाहेब आंबेडकर सर्व आलुतेदार बलुतेदारांना एकत्र करुन त्याच राजकीय मार्गाने पेशव्यांना जेरीस आनत आहेत व सर्व बहुजन समाज आज त्यांच्यामागे एकमताने उभा ठाकुन पुन्हा प्रतिक्रांती होणार नाही, पुन्हा आम्ही गुलाम होणार नाही असा एल्गार केला जात आहे.
त्यावेळी ते सैनिक तलवारी च्या सहाय्याने लढले व जिंकले पन लोकशाहीत आपल्याला हिच आधुनिक पेशवाई विरुद्ध शिवशाही / लोकशाही हि लढाई मता च्या सहाय्याने जिंकायची आहे, आपले हत्यार आपले " मतदान " असणार आहे. त्यामुळे नवपेशवाई संपवण्यासाठी आपला मताधिकार आपल्या अस्तित्वावर उठलेल्या मनुवाद्यांना न विकता तो मताधिकार वापरुन पेशव्यांना सत्तेपासुन कायमचे दुर करा व त्या ५०० विरांना खरी आदरांजली वहा असे अवाहन करतो.
जय भीम, जय शिवराय
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009

______________________________

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..

१ जानेवारी च्या निमित्ताने समाजबांधवांसाठी..
भिमा कोरेगाव म्हणजे शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास..
----------------------------------------
भिमा कोरेगांव येथील उभा असलेला  *विजयस्तंभ* हा पेरणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असुन मोठया दिमाखानं भिमानदीच्या काठावर उभा असुन आपल्या महार समजल्या जाणा-या पुर्वजांच्या शौर्याचं तथा स्वाभिमानाचं प्रतिक आहे,जेव्हा हुकूमशहा पेशव्यांनी आक्रमण केलं तेव्हा पिढ्यान् पिढ्या गुलामीच्या बंधनात अडकलेल्या गुलामांचा स्वाभिमान जागा झाला,आम्हाला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणा-या पेशवाईचा खात्मा झाला पाहीजे अशी खुणगाठच जणु या पुर्वजांनी बांधली होती असे या इतिहासातून दिसते,असे असले तरी ही आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून तथा गनीमी काव्यातून झालेली नाही तर ती समजुन उमजुन आणि ठरवुन झालेली ही लढाई होती,आपले हक्क जर मागुन मिळत नसतील तर ते हिसकावुन घ्यावे लागतील,माणुस म्हणुन जगता येत नसेल तर जगण्यात काय अर्थ,याची जाणिव आपल्या पुर्वजांना झाली असावी,पेशवाईने जरी अचानक व द्वेषातुन हे आक्रमण केले असले तरी आपल्या पुर्वजांकडून द्वेषातून झाली नाही हेही तितकेच सत्य आहे, *उद्देश स्पष्ट ठेवुन हक्कासाठी लढणारांचा विजय नक्की होतो,* आणि तसेच आपल्या पुर्वजांनी पेशवाई विरूध्द आपल्या हक्काची लढाई लढुन नेत्रदिपक असं यश मिळवलं,आणि आपल्या शौर्याचा तथा स्वाभिमानाचा विजयी इतिहास रचला,हे यश आपल्याला असे मिळाले की पिढ्यान् पिढ्या त्याची नोंद इतिहास घेतच राहील,त्यामुळे
*येतील किती अन् जातील किती त्याची न आम्हाला भिती*
आता भिती आहे ती आपल्याच्यांचीच आपल्याला,कारण गाडलेली पेशवाई आता नवपेशवाईत पुन्हा जन्माला आलेली आहे,आणि ही नवपेशवाई आपल्याशी कुठल्याही प्रकारे लढत नाही तर ती आपल्या आपल्यात लढत ठेवुन आपल्या पुर्वजांच्या शौर्याचा बदला घ्यायला निघाली आहे,हे जर आपल्याला वेळीच कळलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो,म्हणुन आता पुर्वजांच्या शौर्याचा अभिमान असणा-या वारसदारांनी आता वेळीच सावध झालं पाहीजे,आपल्याला शौर्याच्या इतिहासाबरोबर विचारांचा वारसासुध्दा आहे,म्हणुन आपली कृती ही विचारांच्या आधारावर असली पाहीजे असे मला वाटते.ज्या अहंकारामुळे पेशवाई संपली तीच अहंकाराची बाधा जर आपल्याला होत असेल तर आपणच आपल्याला संपवायला निघालेलो आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.त्यामुळे माझ्या तमाम समाज बांधवानो तथा बाबासाहेबांची विचारधारा मान्य असलेल्या बहुजन बांधवांनो आपण आता आपल्याला वेळीच सावरायला हवं, *युध्दाला नव्हे तर बुध्दालाच स्विकारायला हवं* हीच खरी समाज व देशाच्या सुरक्षिततेची हमी असेल,आणि यामुळेच भिमा कोरेगाव येथे झालेल्या घनघोर लढाईची आपल्या पुर्वजांची शौर्य गाथा येणा-या पिढ्यान् पिढ्यांच्या काळजावर कोरली भिमा कोरेगावचा हाच शौर्याचा तथा स्वाभिमानाचा इतिहास अजरामर राहील..
मी तमाम समाज बांधवांना या निमित्ताने विनंती करेन आपण बुध्द व बाबासाहेब यांच्या विचारधारेवर चालणारे अनुयायी आहोत,आपल्या हातुन कोणताही अनुचित कृत्य घडणार नाही याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे,त्यामुळे कोणतीही अफवा पसरवु नका व अफवांना बळी पडु नका,भिमा कोरेगाव येथे येणा-या प्रत्येक व्यक्तींनी या पवित्र भुमिला व पराक्रमी पुर्वजांना सन्मानाची सलाम द्या व विजयत्सोव साजरा करा,कुणालाही व कुठेही वाईट बोलुन चिडवु नका किंवा घोषणाबाजी करू नका..
येणा-या प्रत्येकाचा प्रवास सुखाचा होवो व येणारे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे ही मनोकामना..
भिमाकोरेगाव विजय दिनाच्या सर्वांना सदिच्छा.
आपला,
विकास साळवे,पुणे
+919822559924...✍

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...