Sunday, 13 January 2019

!!! नामांतर आणि बाळासाहेब आंबेडकर !!!

!!! नामांतर आणि बाळासाहेब आंबेडकर !!!

बाळासाहेब आंबेडकर यांनी नामांतर प्रश्नाला प्राधान्य दिले नाही असा गैरसमज काही लोकांनी करून दिला होता परंतु त्यांच्या या पायी मोर्चाने कळेल कि त्यांनी नामांतराला प्राधान्य दिले होते .दि .२७ नोव्हेंबर १९८३ ला मुंबईतील सिद्धार्थ विहार वडाळा येथे समविचारी लोकांची एक बैठक घेतली व रिपब्लिकन पक्षाबद्दल सविस्तर चर्चा केली .या चर्चेच्या आधारेच पुणे येथे ५ व ६ मे १९८४ ला अधिवेशन घेतले .”अहिल्याश्रम “ येथे घेतलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष्या होत्या गीताबाई गायकवाड .या अधिवेशनाला रा .सु .गवई वा तत्सम नेत्यांना बोलावले नाही .
    कारण हे सगळे नेते पराभूत मानसिकतेत होते आणि ही पराभूत मानसिकता १९७८ साली समंत झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी होत नाही यात अंतर्भूत होती .या अधिवेशनातील बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरविणारे भाषण देण्याचा मोह आवरता येत नाही .ते आपल्या भाषणात म्हणाले होते की ,”डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा आपण निर्धार करत आहोत .या देशातील राजकारणावर संरजामदार श्रीमंताची घट्ट पकड आहे .येथे दलित श्रमिकांना कोणतेही राजकीय अस्तित्व नाही .या बहुसंख्यान्काची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करीत आहोत .सध्याचे एकजातीचे राजकारण ठोकरून आपण सर्वसमावेशक वृत्तीने सर्व तळागळातील समाज व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेऊन केवळ मी पणाची वल्गना न करता पोलादी वृत्तीने सत्ताच ताब्यात घेण्यासाठी लढून या देशातील सर्व राष्ट्रीय प्रश्नाकडे देश हिताच्या दृष्टीने पाहून देशाचे नेतृत्व निर्माण करणारा पक्ष निर्माण करत आहोत .(अर्जुन डांगळे ,सा .प्रबुद्ध भारत २८ ऑक्टोंबर १९८८ पु १३ ).

सर्व तळागळातील समाज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेतल्याशिवाय नामांतराचा प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी जाणले होते .याच काळात मंडल आयोग स्वीकृत करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान व्ही .पी .सिंग यांनी केले होते .मंडल आयोगातील अनेक जातींना राजकीय भान देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले .हा ओबीसी समूह बहुसंख्याक असूनही तो राजकीय सत्तेपासून दूर असल्याचे व त्याचा उपयोग कॉंग्रेस चे मराठा राज्यकर्ते कसा करून घेत आहेत हे समजावून सांगितले .त्यासाठी बहुजनांमध्ये विश्वसर्ह्यता निर्माण केली .काही ठिकाणी माधव ना (मा- माळी , ध – धनगर , व – वंजारी )जवळ करीत त्यांच्यातील राजकीय इर्षा जागृत केली .इतकेच नव्हे तर ओबीसी मधील छोट्या जात समूहांना एकत्र करून सत्ता दिली .पंचायत समिती ,जिल्हा परिषद ही सत्ताकेंद्रे ओबीसी ना मिळवून दिली .अल्पसंख्याकत्वामुळे जे पंचायत समितीतही पोहचू शकत नव्हते त्यांना मंत्री केले .महाराष्ट्रातील राजकारण कूस बदलू लागले केवळ राजकारण नाही तर समाजकारण ही कूस बदलू लागले .मंडल आयोगाच्या निमित्ताने का होईना ओबीसी वर्ग बाळासाहेबांकडे आकृष्ट झाल्यावर बाळासाहेबांनी नामांतराचा प्रश्न हाती घेतला .मला येथे बाळासाहेबांच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा नाही तर नामांतरासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करताना एक बदल नोंदविणे महत्वाचे वाटते आणि ते म्हणजे १९७८ साली जे हात दलितांवर दगड फेकीत होते वा ते हात बाबासाहेबांचे फोटो फाडीत होते तेच हात आता जयभीम बोलू लागले होते .त्यांच्यातील जातीय पीळ नष्ट झाली होती .क्रांती म्हणतात ती हीच ! सामाजिक बदलाला महत्व देणारे बाळासाहेब निवडणुकींचेही राजकारणही करीत होते .१९८६ च्या विधानसभा निवडणुकीत भारीप ने जो जाहीरनामा काढला होता त्यात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला अग्रक्रम दिला होता .(भारिप बहुजन महासंघाची भूमिका पु १११ ).

बाळसाहेब केवळ जाहिरनाम्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे कृती कार्यक्रमासही लागले .त्यांनी ११ जानेवारी १९८६ रोजी राज्यविधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे प्रचंड मोर्चा नेण्यात आला .
दि .२ मे १९८६ या एकाच दिवशी भारिप च्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेऊन नामांतराची अंमलबजावणी करावी म्हणून निवेदन देण्यात आले . दि .१५ व १६ मे १९८६ रोजी औरंगाबाद येथील नेहरू भवन येथे दुष्काळ परिषद घेतली होती .या परिषदेत नामांतराच्या अंमलबजावणीवर दीर्घ चर्चा झाली व सरकारला निवेदन देण्यात आले . २७ जुलै १९७७ रोजी औरंगाबादेत adv बि .एच .गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाने वातावरण निर्मिती केली .दि .२७ जुलै १९८८ ला नामांतर ठरावाला एक दशक झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात आला .या मोर्चात सुमारे २५ हजार लोक सहभागी झाले होते .काहीसा मागे पडलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला .दि  १० ऑगष्ट १९८८ रोजी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे बाळासाहेबांचे नामांतर या विषयावर व्याख्यान झाले त्यात ते म्हणाले होते कि ,मराठवाडा नामांतराच्या चळवळीमागील सामाजिक आशय बाजूला सारून निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून हा विषय हाताळला जात आहे .मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर करून टाकावे ,कारण ते स्वतःला  नामांतरवादी समजतात .शिवसेनेसारख्या संघटनेच्या भीतीने नामांतर प्रश्न चिघळत गेल्यामुळे हा प्रश्न सावधानतेने हाताळला जावा.(प्रबुद्ध भारत २७ .८ .१९८८ पृ २ )

१९७८ नंतर झालेला उद्रेक १९७९ चा सत्याग्रह ,लॉंग मार्च याचा परिणाम झालाच पण त्याच काळात माझी पोष्टर कविता मुळे तरुणाची मुठी वळवल्या होत्या ती कविता अशी होती

             ..............रक्ताची माणस
चला तर म्यानातील तलवारी आता बाहेर काढा
भिंतीभिंतीवरील बंदुकांचे चाप पुन्हा एकदा चाचपून पहा
कशाला ऐकता बक्कास त्यांची :
“टाइम इज नॉट राईट फॉर रिव्हाल्युशन
बुडाखाली शेव्हरलेट अन आकाशाला कवेत घेणार छप्पर
यांचा उपभोग घेत घेत ते उद्याच्या क्रांतीचा जयजयकार करणार
शस्त्र हातात घेण्याची वेळ येताच
खोट लावून दूर पळणार
पहा माझ्या डोळ्यातून :तो जनसमुदाय तुमच्याच रोखाणे झेपावतोय
.............................................................................. ज.वि .पवार

अशाप्रकारची कविता भीत्तीचीतावर लावलेली होती त्याला काढून टाकण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते .परंतु तरुणांच्या मनात पेटलेली कवित विझणार नव्हती .

मास मोव्हमेंट ,भारतिय रिपब्लिकन पक्ष ,दलित मुक्ती सेना इ .संघटना नामांतरासाठी आग्रह धरीत होत्याच भारतीय दलित पंथर चे नेते रामदास आठवले सत्तेत गेल्यामुळे त्यांनी लढा खंडित केला होता .दलित पंथर चे काही गट आपापले अस्तित्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते .अशा वेळी गंगाधर गाडे यांचा एक गट एकाएकी चर्चेत आला कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी गौतम वाघमारे यांनी २५ /११/१९९३ रोजी नांदेड येथे आत्मदहन केले .या दहनामुळे आंबेडकरी समाजात जसा उद्रेक झाला तसा शासनालाही धक्का बसला .आपण नामांतरासाठी बलिदान करीत आहोत असे वाघमारे यांनी लिहून ठेवले होते व त्याचवेळी माझे नेते गंगाधर गाडे आल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी अपेक्षा केली होती .गाडे यांना तातडीने नांदेड ला जावे लागले.पुन्हा एकदा वातावरण तप्त झाले . त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह राजा ढाले ,अविनाश महातेकर इ मध्ये बैठक झाली .शरद पवार बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणाले कि मी नामांतराबाबत मी निर्णय घेईल पण याचे श्रेयही मीच घेईल .त्यांनतर १४ जानेवारी १९९४ रोजी नामांतर झाले असे जाहीर केले परंतु ते नामांतर नव्हते ,नामविस्तार ही नव्हता आणि तरीही मुख्यमंत्री शरद पवार यांनी बंदुकीचा धाक नामांतरवाद्यांना दाखविला होता तसा सौम्य नामांतरविरोधकांनाही दाखविला होता .

नामांतर गपचूप मान्य करा हा दलितेतर संदेश देण्यात आला तर ही तडजोड मान्य करा अन्यथा सरकार शस्त्र हाती घेईल १४ जानेवारी १९९४ रोजी झाले ते नामांतर होते असे समजून हा दिवस औरंगाबादेत आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .पण हे लोक विसरतात कि आभाळभर उंची असलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाला एका प्रदेशापुरते बंधिस्त करण्यात आले ...........

           संदर्भ – आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड ५ मधील उतारा
           लेखक – ज .वि पवार

Friday, 11 January 2019

असुयेतून ऊत्पन्न होणारा विरोध.

असुयेतून ऊत्पन्न होणारा विरोध.
- भास्कर भोजने.

अँड बाळासाहेब आंबेडकर हे गेली ३७ वर्षे सार्वजनिक जिवनात, राजकारण समाजकारण करीत आहेत...!
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक लढे ऊभे केले आणि यशस्वी केले...!
  त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली परंतु श्रेयवादात अडकले नाही...!
ते जागतिक किर्तीच्या घराण्याचे वारस असल्यामुळे त्यांना प्रसिद्धीच्या मागे फिरायची कधीही गरज पडली नाही...!
     एक जानेवारी २०१८  ला मनुवादी लोकांनी निशस्त्र जनतेवर हल्ला केला आणि आधुनिक पेशवाईची जाणिव करुन दिली..!
म्हणून काळाजी गरज लक्षात घेऊन अँड बाळासाहेब आंबेडकरांनी  ३ जानेवारी ला महाराष्ट्र बंद ची हाक दिली...!
गेल्या सत्तर वर्षातील ऐतिहासिक बंद ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जनतेने अनुभवला...!
केवळ मुंबई बंद करणारे ऐट मिरवायचे परंतु कडकडीत महाराष्ट्र बंद सत्तर वर्षात एकदाच झाला तो म्हणजे ३ जानेवारी २०१८ ला...!
  महाराष्ट्र बंद ची हाक अँड बाळासाहेब आंबेडकरांनी दोन जानेवारी ला दिली म्हणजे बंद साठी कुठलीही तयारी न करता...!
   न भुतो असा महाराष्ट्र बंद घडून आला ,याचे श्रेय भारतीय मिडियाने अँड बाळासाहेब आंबेडकर यांना दिले...!
त्यामुळे अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय वजन वाढले...!
त्यामुळे अँड बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय ऊंची वाढली...!
असा समज काही लोकांचा  झाला.वास्तविक नेता हा नेता असतो. ज्याला जनतेची नाडी ओळखता येते तो काळावर आपली छाप सोडतं असतो...!
अँड बाळासाहेब आंबेडकर हे वैचारिक प्रग्लभ नेतृत्व आहे, ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे...!
नामांतर लढ्यात, रिडल्स प्रकरणात, आंबेडकर भवनच्या लढ्यात ,दलित अत्याचार ऊना प्रकरणात, रोहित वेमुला प्रकरणात, मंडल आयोगाच्या संदर्भात, आणि आता भिमाकोरेगांव प्रकरणात....!
   आंबेडकरी समाज समुह एकत्र येतांना पाहून काही लोकांना मळमळ व्हायला लागली आहे...!
म्हणून असुयेपोटी काही लोकांनी अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणे सुरु केले आहे...!
  मित्रहो, तुमच्या विरोधाने बाळासाहेब आंबेडकर लहान होणार नाहीत, किंवा बदनामही होणार नाहीत...!
  रामानंद तिर्थ यांच्या चरित्रात एक ऊदाहरण आहे.
शिक्षक फळ्यावर एक रेषा ओढतात आणि वर्गातील विद्यार्थ्यांना सांगतात की, या रेषेला स्पर्श न करता ती रेषा लहान करुन दाखवा...!
प्रत्येक जण आपापल्या परिने डोकं चालवतो परंतु रामानंद तिर्थ खडू घेऊन त्या रेषे शेजारी दुसरी तिच्या पेक्षा मोठी रेषा काढतात आणि सिद्ध करतात की, ही रेषा लहान आहे...!
मित्रहो, हा जगण्यातील सिद्धांत आहे. हे मानवतावादी तत्वज्ञान आहे. जो ज्या ऊंचीवर असेल तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठे व्हायचे असेल तर अधिक ऊंच भरारी घ्या आणि सिद्ध करा आपले मोठेपणं ...!
परंतु येथे तर पाय ओढण्याचा प्रयत्न केला जातो आहे...!
असुयेतून अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टिका करणा-यांनो तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते आहात, त्या नेत्याला म्हणा तुम्ही अधिक चांगले आणि धाडसाचे कार्य करा .परंतु अँड बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करायला नका शिकवू....!
ज्यांना अँड बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व सहन होतं नाही त्यांनी वेगळी भुमिका घ्यायला कुणी अडविले नाही, मात्र बदनामी कशासाठी...??

Thursday, 10 January 2019

नेता काय करु शकतो...!

नेता काय करु शकतो...!
: भास्कर भोजने

गेल्या तीन वर्षापासून देशात जे सरकार आहे, त्या सरकारला हे हिंदु राष्ट्र म्हणून निर्माण करायचे आहे...!
     हिंदू राष्ट्र निर्माण करण्यात संविधान हा सर्वात मोठा अडथळा आहे...!
संविधान बदलणे हा मुख्य हेतू घेऊन आरएसएस आणि मनुवादी कार्यरत आहेत.
    संविधान बदलण्यासाठी जे बहुमत पाहिजे त्या साठी धार्मिक धृवीकरण करुन पाशवी बहुमताचे गणित मांडले जात आहे...!
    त्याचाच भाग म्हणून इथल्या अल्पसंख्याक समुहाला टारगेट केल्या जात आहे....!
म्हणून गेली तीन वर्षे झालीत सर्वात मोठा अल्पसंख्याक समुह मुस्लिम यांना हेरुन हेरुन त्यांच्या वर अन्याय अत्याचार केले जात आहेत...!
    जिथं जिथं शक्य आहे तिथं मुस्लिम बांधवावर अन्याय केला जात आहे. परंतु हा  सर्वात मोठा समुदाय निमुटपणे हे सर्व सहन करीत आहे. कारण मुस्लिम समुदायाकडे नेतृत्व नाही. जे जे नेते म्हणवून घेतात ते नेते नसुन ते प्यादे आहेत...!
    कुणी काँग्रेस चं ,कुणी भाजपचं तर कुणी समाजवादी, बसपाचं प्याद आहे, नेता नाही.
   दलित समुदाय हा १२ % अल्पसंख्याक समुदाय आहे. या घटकावरही गेल्या तीन वर्षात अन्याय अत्याचार वाढलेतं परंतु दलित समुह अन्याय, अत्याचार निमुटपणे सहन करीत नाही तर प्रतिकार करतो आहे...!
      गुजरात मधील ऊना कांड झाले. दलितांनी प्रतिकार केला. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी ऊना ला जाऊन दलितांना ऊपदेश केला, हिंदू धर्म सोडा धर्मांतर करा...!
  दलित स्काँलर रोहित वेमुला वर अन्याय झाला अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत मोर्चाकाढला आणि मनुवादी सरकारला जबाब विचारला...!
  भिमाकोरेगांव ला दलित समुहावर दगडफेक केली अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आणि मनुवादी भिडे आणि एकबोटे ला आरोपी म्हणून सरकारला कार्यवाही करायला भाग पाडले...!
    दिल्ली पर्यंत सर्वांना जबाब विचारला.दलित अत्याचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविला...!
    समाजाला नेता असेल तर त्या समाजाचं दु:ख निवारणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात .परंतु समाजाला नेताचं नसेल तर दाद कशी मागणारं....!
   नेता म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आमदार नव्हे....!
  नेता म्हणजे व्यवस्थेला जबाब विचारणारं आणि शासन संस्थेला कायदा राबविण्यासाठी बाध्य करणारं व्यक्तीमत्व...!

डाव्यांचे उजवे रंग - सुमित वासनिक.

डाव्यांचे उजवे रंग - सुमित वासनिक.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतांना या सरकार मधील सरंजाम आणि जातीय राजकारण्यांनी उच्छाद मांडलेला होता. दलित, आदिवासी अत्याचार आणि भ्रष्टाचाराची रोज नवीन प्रकरणे उघड होत होती. अश्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधात ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी आणि CPI, CPM सारख्या डाव्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. ही आघाडी 2018 पर्यंत कार्यरत होती. पण 2018 मध्ये भंडारा मतदारसंघातील निवडणुकिवेळी CPI या पक्षाने भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास समर्थन देऊन आपला प्रवास डावी कडुन उजवी कडे सुरू केला असल्याचे आपण पाहत आहोत.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडी तयार झाली होती त्या हेतुलाच हरताळ फासत CPI ने  भंडारा निवडणुकीत खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले. भंडारा निवडणुकी नंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान बचाव रॅलीत CPI आणि CPM या पक्षांनी ते पूर्णपणे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहेत असे दाखवून दिले. पुढे CPI आणि CPM या पक्षांनी काँग्रेसच्या महाआघाडी संबंधित बैठकांना हजेरी लावणेही सुरू केले. आपल्या या वागणुकीतून डाव्यांनी आपण आता महाराष्ट्र लोकशाही आघाडी सोबत नाही असा स्पष्ट संदेश दिला. पण काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणी आपली ही भूमिका बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी डाव्यांनी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनि एमआयएम या पक्षा सोबत युति केल्याचे कारण दिले. हे कारण देतांना डावे हुशारीने लपवतात की ओवेसी वंचित बहुजन आघाडीत यायच्या आधीच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जायचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एमआयएमला विरोध करतांना डाव्यांनी स्वतः केरळ मध्ये मुस्लिम लीगच्या सोबत युति करून निवडणुका लढविलेल्या आहेत, मुस्लिम लीग सोबत बसून आपण सत्ता उपभोगली आहे हे CPI आणि CPM हे पक्ष विसरतात. मुळात या पक्षांना एमआयएमचा प्रॉब्लेम नाही, 5-6 वर्षे भारिप सोबत असतांना हे पक्ष आपल्या संघटनेत एकही नवीन माणूस जोडण्यात अपयशी ठरले हे यांचे खरे दुखणे आहे. आपण अपयशी ठरलो आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर आपला पक्ष वाढविण्यात यशस्वी झाले, आपल्याला जे करायचे होते त्याचे अगदी उलटे झाले या जातीयवादी मानसिकतेतूनच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत संधान साधले आहे. डाव्यांनी काँग्रेस सोबत गेल्यानंतर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे डाव्यांसोबत एकाही राज्यात युति केली नाही तरीही डावे काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणे राजकारण सोडण्यास तयार नाहीत यामागील एकमेव कारण म्हणजे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढते राजकीय वजन रोखण्याची जातीयवादी भूमिका हेच होय.
भाजप-सेनेच्या धर्मांध राजकारणापासून देशाला वाचविण्यासाठी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आहोत हे असे डावे पक्ष सांगतात आणि आपल्या या जातीयवादी राजकारणाला लपवू पाहतात, पण सत्य काही केल्यास समोर येतेच. CPI चा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फिरून भाजपपासून देश वाचवायच्या गोष्टी करतो आहे तर दुसरीकडे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर महानगरपालिकेत भाजपला मतदान करून भाजप सोबत बसला आहे. डावे जर खरोखरच भाजप विरोधात असतेतर त्यांनी अहमदनगर प्रकरणी राष्ट्रवादीच्या भूमिकेला विरोध केला असता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राजकीय संबंध तोडले असते पण डाव्यांनी याविषयी साधा विरोधही दर्शविलेला नाही. डाव्यांना भाजपचे वावडे नाही हे महाराष्ट्रातील CPM चे नेते नरसैय्या आडम मास्तर यांनी सोलापूर येथील प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात हजेरी लाऊन आणि मोदींवर स्तुतीसुमने उधळून स्पष्टच केले आहे. डावे पक्ष एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी आर्थिक आरक्षणावर भाजपला संसदेत समर्थन देऊन ते संविधानाच्या विरोधात असल्याचेही दाखवून दिले आहे. डावे पक्ष एकानंतर एक भाजपला पूरक अश्या भूमिका घेत आहेत आणि त्याचवेळी ते वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा अपप्रचारही करीत आहेत, यावरून डाव्या पक्षांचा जातीयवादी चेहरा खुलून समोर आला आहे.
आंबेडकरी चळवळीत ज्याप्रमाणे अनेक संघटना आणि पक्ष आहेत त्याचप्रमाणे मार्क्सवादी चळवळीतही अनेक संघटना आणि पक्ष आहेत. अनेक डाव्या संघटना आजही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहेत तर CPI आणि CPM हे पक्ष बाळासाहेबांची साथ सोडून सरंजामी भांडवलदारांना शरण गेल्या आहेत.  CPI आणि CPM सारखे डावे पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या, ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गेल्याने बाळासाहेबांचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट बाळासाहेबांसोबत असल्यामुळे डाव्या चळवळी बद्दल लोकांना जी आपुलकी वाटायला लागली होती त्या आपुलकीला डाव्यांनी वंचित बहुजन आघाडिला विरोध करून तिरस्कारात परावर्तित केले आहे. हे डाव्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे, येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम यांना भोगावे लागतील. डाव्यांचे समोर आलेले हे उजवे रंग पाहून त्यांनी मानवमुक्तीच्या लढ्यासोबत दगाबाजी केली आहे हे सिध्द झाले आहे, मार्क्सच्या तत्वज्ञानाला या पक्षांनी भांडवली आणि ब्राह्मणवादी पक्षांच्या समर्थनात जुंपले आहे. काळ कोणालाच विसरत नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकि वेळी डांगेंनी घेतलेल्या भूमिका प्रमाणे 2018-19 मधील डाव्यांच्या या भूमिका काळया अक्षरात भविष्याच्या पटलावर ठळकपणे दिसत राहतील आणि डाव्यांच्या जातीयवादी राजकारणाची साक्ष देत राहतील.

तुमची " दलाली "उघडी पडली...!

तुमची " दलाली "उघडी पडली...!
: भास्कर भोजने
       डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील "आरक्षण "हा विषय लिहितांना अगदी स्पष्ट शब्दात त्याचा ऊद्देश सांगितला आहे...!
  "आरक्षण " हे सामाजिक न्यायासाठी दिले जाणार आहे...!
  म्हणून आरक्षणाचे तत्व लागू करतांना निकष हा "सामाजिक मागासलेपणा " असला पाहिजे...!
   ही भारतीय राज्यघटनेची चौकट आहे,ही चौकट मोडून कुणीही नवं धोरण आखु शकतं नाही असा निर्णय सुप्रिम कोर्टाचा आहे...!
   तरीही मनुवादी मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देतांना आरक्षणाचा निकष हा "आर्थिक " लावला आणि सवर्णांना १० टक्के आरक्षण लागू केले...!
   ही भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्याची सर्वात कुटिल अशी चालं आहे...!
    भारताच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा होतं होती तेव्हा सच्चे " आंबेडकरवादी " या दुरुस्तीला कडाडून विरोध करतील अशी प्रत्येक सुज्ञ माणसाची अपेक्षा होती...!
   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमाने जे राजकीय आरक्षण मिळाले त्यामुळे आम्ही संसदेत आहो ही भावना एस.सी.एस.टी.खासदारामध्ये असेलचं अशीही धारणा जनतेच्या मनात होती...!
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणा-या नेतृत्वाने तरी यावेळी आपलं प्रांजळ मतं मांडून ही घटना दुरुस्ती घटनाबाह्य आहे अशी  "जिभ " हालवून बोलावे अशी माफक अपेक्षा आंबेडकरी जनतेची होती...!
      परंतु जेव्हा या १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा झाली तेव्हा राखीव जागेवर निवडून आलेले " दलाल " हे विचाराने आंबेडकरी नाहीत तर संधी साधून घेण्यासाठी मनुवादी पक्षांचे दलाल आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे...!
     जे जे राखीव जागेवरुन निवडून आले आहेत आणि तिथं खुर्च्या गरम करीत आहेत त्यांना राज्यघटनेशी आणि आंबेडकरी तत्वज्ञानाशी काही एक देणेघेणे नाही...!
    त्यांना दलाली करुन पोट भरायचे आहे,मालक नाराज होऊ नये म्हणून हे गुलाम वृत्तीचे लोकं साधी औपचारिकता  देखील दाखवू शकले नाहीत, यांनी जिभं सुद्धा हलविली नाही,यांनी साधा निषेध नोंदवला नाही,यांची वैचारिक बांधिलकी ही पोटाशी,पैशाशी आणि,लाचारीशी आहे हे यांनी दाखवून दिले आहे..!
  शेर कभी घास खाते नहीं.हेच खरे आहे..!
आणि नामर्द कभी लढाई लढते नहीं.
वैचारिक बांधिलकी असलेली माणसे कुठंही आणि केव्हाही आपल्या ध्येय्यापासुन तसुभरही मागे हटतं नाहीत...!
   जेव्हा संसदेत १२४ व्या घटना दुरुस्ती बिलावर चर्चा सुरू होती तेव्हा भाजपचे मनुवादी सरकार राज्यघटनेवरचं घाव घालीत आहे हे पटवून देण्यासाठी एम आय एम पक्षाचे असोदऊद्दीन ओवेशी, इंडियन युनियन मुस्लिम लिगचे ईटी बशीर मुहम्मद आणि पि.के. कुंजलकुटी हे या बिलाचा कडाडून विरोध करीत होते.,त्यांनी या बिलाच्या विरोधी मतं नोंदवून आपली वैचारिक बांधिलकी सिद्ध केली...!
  मात्र राखीव जागेवरुन निवडून आलेल्या दलालांची दलाली ऊघड झाली आहे...!
  मित्रहो हे घरभेदी आता यापुढे लक्षात ठेवा...!
राजकीय आरक्षणामुळे " दलालांची " नवी जातं निर्माण झाली आहे हेही या निमित्ताने सिद्ध झाले आहे...!
  जयभीम.
- भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...