Wednesday, 9 January 2019

ऐतिहासिक बदलाच्या दिशेने...!
:भास्कर भोजने
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते लोकशाहीमध्ये "सत्ता " ही सर्व समस्यांवरची "मास्टर की" आहे...!
      विषमतावादी, मनुवादी, मंडळीने अतिशय धुर्तपणे ही मास्टर की, संपादन करण्यासाठी सोंग, ढोंग रचून सत्ता आपल्या अंकित केली...!
    लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी लोकांची मर्जी संपादन करावी लागते म्हणून मनुवादी,कुणी "सेक्युलर"झाले...!
कुणी, समाजवादी झाले, कुणी धर्मवादी झाले, कुणी कम्युनिस्ट झाले, सगळे सोंग घेवून वेगवेगळ्या झुंडीत सामिल झाले, आणि सत्तेची चावी आपल्या अंकित केली...!
    सत्ता बहूजन वर्गाकडे जाऊ नये म्हणून ती आपसात, कुटुंबात , किंवा मग नातेवाईकांत विभागुन घेतली आणि बहूजन वर्ग "उपेक्षित"कसा राहिल याची तजवीज करून ठेवली....!
   आम्ही लोकशाही स्विकारुन ऊणेपुरे सत्तर वर्षे झाली आहेत, अनुभव अतिशय वेदनादायी आहे इथे जे उपेक्षित आहेत, त्यांच्या समस्या सूटण्याऐवजी अधिक जटील बनवल्या गेल्या आहेत...!
    जे बहूजन आहेत परंतु छोट्या छोट्या जातींत विखुरलेले आहेत त्यांना सत्तर वर्षे झाली मात्र विधानभवनात किंवा संसदेत साधा पायही ठेवता आला नाही...!
    हा वेदनादायी अनुभव सहन करता करता सत्तर वर्षे निघून गेली, मनुवादी,मंडळीची सोंग ढोंग पाहुन पाहुन सत्तर वर्षे संपली...!
यांचे दर पंचवार्षिक निवडणुकीला नवे सोंग समोर येते,मात्र उपेक्षित वर्गासाठी यांच्याकडे कुठलेही धोरण नाही की, योजना नाही,..!
  जे काही आहे ते केवळ नाटकं आणि बतावणी....!
  असे म्हणतात की, " गरज ही शोधाची जननी आहे " उपेक्षित वर्गाला आरक्षण नाही,समस्याग्रस्त समाजाला ठगविले जाते आहे मग आपले हक्क आणि अधिकार मिळवायचे कसे...??
   या सोंगाड्या राजकीय पुढाऱ्यांवर विश्र्वास ठेवायचा किती वर्षे...??
    या गरजेतुन मग सत्तेचा शोध घ्यायची प्रक्रीया सुरू झाली आहे...!
  धनगर समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी ६० वर्षे लढा दिला आहे परंतु पदरी निराशाच पडली आहे...!
 माळी समाजाची संख्या मोठी आहे तरीही संसदेत प्रतिनिधित्व कुणी देतं नाही, त्यांना सत्ता हवी आहे...!
भटका विमुक्त समाज सत्तर वर्षे निघून गेली आजही कुण्या गावांत भिक मागायला गेला तर त्याला ठेचून मारले जाते,त्याची साधी ओळख या देशाने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली नाही...!
   साळी,कोष्टी,सुतार,लोहार,मांगगारुडी, कुंभार,बेलदार अशी महाराष्ट्रातील अनेक जातीची माणसें आहेत की,त्यांनी केवळ मते द्यावीत आणि मनुवादी माणसांना सत्तेत बसवावे व आपले जीवन अतिशय कष्टमय अवस्थेत जगावे...?
  ज्या लोकशाहीने प्रत्येक माणसाला समतेचे हक्क आणि अधिकार दिलेत ती लोकशाही आणि त्या लोकशाहीला नियंत्रीत करणारी " राज्यघटनाचं " बदलण्याची तयारी जेव्हा या मनुवादी मंडळीने केली आहे असे समजले तेव्हा हा उपेक्षित समाज समुह पेटून उठला आणि आणि बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे...!
   माझी समस्या मीच सोडवणारं...!
आता मीच सत्ताधारी होणारं....!
मी कुणाकडेही याचना करणार नाही,मीच आता दाता होणारं....!
     मी घराणेशाही संपवणारं आणि लोकशाहीचे सामाजिकरण करणारं...!
  मी मनुवादी मंडळीला सत्तेबाहेर फेकून माझ्या माणसाला बहुजन बांधवांला प्रतिनिधी बनविणारं...!
    अशी भुमिका घेऊन महाराष्ट्रात बहूजन समाज " वंचित बहूजन आघाडीचा" अजेंडा घेऊन पुढे निघाला आहे ही ऐतिहासिक बदलाची नांदी आहे...!
   हा उपेक्षित समाज गेली दहा महिने झाली आहेत, लाखा लाखाने एकत्र जमतो आहे आणि सत्ता संपादन मेळावे घेतो आहे...!
धनगर समाज सत्ता संपादन मेळावा २० मे २०१८ ला झाला होता...!
  हा समस्याग्रस्त समाज कोणतीही सुविधा उपलब्ध नसतांना थंडीच्या दिवसात शेकडो मैलाचा प्रवास करुन लाखा लाखाची अधिवेशने यशस्वी करतो आहे...!
   हा उपेक्षित माणूस स्वत:च सत्तेचा वाटेकरी होण्यासाठी सिद्ध झाला आहे ही त्याची पावती आहे आणि म्हणून मित्रहो आता ऐतिहासिक बदल घडणारं आहे...!
   इथला धनगर,माळी, मुस्लिम, बौद्ध , मातंग,भटका विमुक्त, आदिवासी आणि ओबीसी तसेच सकल मराठा माणूस ओरडून ओरडून सांगतो आहे की, मला आता सत्ता संपादन करायची आहे,...!
  या देशात एक टक्का माणसांनी ८३ टक्के संपत्ती आपल्या ताब्यात घेऊन इथल्या बहूजन समाजाला भुकेकंगाल बनविले आहे...!
हे संपत्तीचे धृवीकरण करण्यासाठी इथल्या सत्ताधारी,सत्तेतीला लोकांची धोरण कारणीभूत आहेत हेही जनतेने लक्षात घेतले आहे,...!
   आता बदल होणारच आहे तो बदल सत्तेतून समतेकडे या मार्गाने होणारं आहे म्हणून हा बदल ऐतिहासिक बदल आहे...!
    जयभीम.
- भास्कर भोजने.

Tuesday, 8 January 2019

आरक्षण हा काही गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही.

- सुमित वासनिक

 सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणा मूळे ज्या समूहाचे शिक्षण , प्रशासन आणि शासन अश्या अनेक ठिकाणी अत्यल्प प्रतिनिधित्व आहे त्या समूहांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आरक्षण व्यवस्था अस्तित्वात आणल्या गेली आहे.
आर्थिक मागासांच्या विकासासाठी विविध योजना आणून त्यांच्या विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करता येऊ शकतात. एखाद्या विद्यार्थ्यास शिक्षण घेण्यात आर्थिक अडचण येत असेलतर त्याला स्कॉलरशिप देऊन त्याचा प्रश्न मिटविता येतो. त्यासाठी त्या विद्यार्थ्यास आरक्षण देण्याची गरज नाही.
आर्थिक आधारावरील आरक्षण म्हणजे संविधानाने सामाजिक आणि आर्थिक आधारावर दिलेल्या जातिआधारीत आरक्षणाला संपविण्याचा दृष्टीने उचललेले सर्वात मोठे पाऊल आहे. यामागे हळूहळू जातिआधारीत आरक्षण संपविणे हाच मुख्य अजेंडा आहे. आर्थिक आरक्षणामागिल हा हेतू माहिती असूनही स्वतःला आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या RPI(A), लोक जनशक्ती पक्ष (पासवान) आणि बिएसपि सारख्या पक्षांनी या आरक्षणाला समर्थन दिले आहे. या पक्षांची ही कृती संविधान विरोधी आहे. एससी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण हिरावू पाहणाऱ्या शक्तींचे हे पक्ष गुलाम झाले आहेत हेच यांनी आर्थिक आरक्षणाला समर्थन देऊन सिध्द केले आहे. 85% विरुद्ध 15% चा बहुजनवाद मानणारा कांशीराम यांचा पक्ष 15% सवर्णांचा पाठीराखा झाला आहे. आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपच्या तालावर नाचत आठवले यांचे चळवळ विरोधी कृत्य आताही सुरूच आहेत. या पक्षांच्या समर्थनात असलेल्या लोकांनी आतातरी जागे व्हावे आणि ब्राह्मणवाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या या पक्षांना सोडून आरक्षण वाचवण्याच्या लढ्यात सामील व्हावे  अन्यथा यांच्या येणाऱ्या पिढ्या यांना माफ करणार नाहीत.
भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनो आणि समर्थकांनो तुम्ही ज्या पक्षात आहात, ज्या पक्षाचे समर्थक आहात त्या पक्षाने, पक्षाच्या नेत्याने संविधान विरोधी असलेल्या आर्थिक आधारावरील आरक्षणाला जाहीर विरोध केला आहे याचा अभिमान बाळगा.
सुमीत वासनिक...

Friday, 4 January 2019

ज्यांना बेईमान व्हायचे आहे त्यांना होऊ द्या - सुमित वासनिक.

ज्यांना बेईमान व्हायचे आहे त्यांना होऊ द्या - सुमित वासनिक.
जिग्नेश मेवानी आणि चंद्रशेखर रावण हे महाराष्ट्रा बाहेरील युवक जेंव्हा भाजपच्या मोदि सरकार विरोधात उभे झाले तेंव्हा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना साथ दिली. जिग्नेशला निवडुन आणण्यासाठी बाळासाहेबांनी स्वतः जाऊन प्रचार केला, गुजरात मधील अनेक आंबेडकरी, दलित कार्यकर्त्यांनाही त्याचा प्रचार करायला लावला. जिग्नेशच्या प्रचारनिमित्त बाळासाहेबांनी 26 नोव्हेंबर 2017 ते 6 डिसेंबर 2017, अशी तब्बल 10 दिवस त्याच्या मतदारसंघात संविधान जागर यात्रा काढली होती, तेंव्हाकुठं जिग्नेश निवडून आला. तसाच चंद्रशेखर रावण, सहरनपुर दंगलीनंतर पोलीस अटकेत असतांना रावणच्या सुटकेसाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. 16 सप्टेंबर 2017 ला रावण जेलमध्ये असतांना बाळासाहेब स्वतः त्याला भेटायला गेले होते, त्याच्या वकिलांच्या टिमला मार्गदर्शन केले. दिल्ली मध्ये मोठा मोर्चा काढून रावणच्या सुटकेसाठी आंदोलन केले. महाराष्ट्रात आल्यावर रावणला जेंव्हा नजरकैदेत ठेवण्यात आले त्याविरोधातही बाळासाहेबच बोलले ज्यामुळे रावणची नजरकैदेतुन सुटका झाली.
जिग्नेश आणि रावण या दोघांना बाळासाहेबांनी मदत केली आता हे दोघेही बाळासाहेबांच्या विरोधात महाराष्ट्रात फिरत आहेत. ज्या राष्ट्रवादिने दलित, आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले आज जिग्नेश मेवानी त्याच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बाळासाहेबांच्या विरोधात फिरतो आहे. तर चंद्रशेखर रावण बाळासाहेबांची चळवळी प्रति असलेली इमानदारी पाहून नंतरच समर्थन देऊ अशी व्यक्तव्ये करीत आहे. या दोघांच्या या बेईमानी वागणुकी मूळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेमध्ये या दोघांबद्दल संतापाची लाट उसळली आहे. हे दोघे कोणाच्यातरी इशाऱ्यावर बाळासाहेबांना विरोधासाठी फीरतायत अशी भावना आंबेडकरवाद्यांमध्ये तयार झाली आहे. या दोघांना ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मदत करायलाच नको होती असे सर्व बोलत आहेत.
मित्रांनो एक लक्षात घ्या ब्राह्मणवादी व्यवस्थे सोबत लढणाऱ्या प्रत्येकाला बाळासाहेब मदत करीत आले आहेत. यातील जिग्नेश आणि रावण सारखे काही बाळासाहेबांच्या विरोधात जातीयवाद्यांनाच साथ देत आहेत तर काही आजही बाळासाहेबांच्या सोबत प्रामाणिक पणे काम करीत आहेत. जे आपल्याला सोडून गेले , बेईमान झाले त्यांना सोडून आणि जे आपल्या सोबत आहेत त्यांना घेऊन बाळासाहेब आंदोलन चालविणारच आहेत. पुढे अजूनही ज्या युवकांना मनुवादी सरकार त्रास देईल बाळासाहेब त्यांच्या समर्थनातही उभे राहतील त्यांना मदत करतील. काही बेईमानांमुळे बाळासाहेब चळवळीत येत असलेल्या नव्या नेतृत्वास मिळेल त्याप्रकारे मदत करण्याचे थांबवणार नाहीत. पुढे चालून हे युवक आपल्यालाच आव्हान उभे  करतील असे म्हणून बाळासाहेब मदत करण्यापासून थांबणार नाहीत. भविष्यात त्यांना कोणता मार्ग निवडायचा आहे हे ते युवक ठरवतील, यावरूनच त्यांची चळ्वळीप्रतीची बांधिलकी कळेल. बाळासाहेबांचा मार्ग ठरलेला आहे ते मनुवाद्यांविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला साथ देतील.
ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान उभे केले आहे. त्यामुळे प्रस्थापित अशी अनेक लोक उभी करून त्यांना बाळासाहेबांना विरोध करायला लावले जाईल. पण आंबेडकरी जनता आता जागृत आहे ती , ती कशालाच भुलणार नाही , ही जनता बाळासाहेबांच्याच सोबत राहील हे येणार काळ पहिलच.

Thursday, 3 January 2019

जात आणि धर्माच्या धोकादायक वळणावर राष्ट्र! - राजेंद्र पातोडे.

जात आणि धर्माच्या धोकादायक वळणावर राष्ट्र!
- राजेंद्र पातोडे.
भाजपवाले सत्तेसाठी कुठल्या स्तराला जातील याला काहीच मर्यादा उरली नाही.माणसेच नव्हे तर हिंदू समाजाची आराध्य असलेल्या देवांना निवडणुकीत मतासाठी वापरन्यात ते पटाईत आहेत.राम मंदिर मुद्दा घेऊन पाच राज्यातील निवडणुकीत उतरताना भाजपवाल्यानी पध्द्तशीरपणे नंतर हनुमानाच्या जातीचा संदर्भ घेऊन घमासान सुरु केले. हा घमासान निवडणुका संपल्या तरी काही संपण्याची लक्षणे दिसत नाहीत.आधी पासून राजकारणासाठी रामाचा वापर करण्यात भाजपवाले सज्ज होतेच, त्यात आता चक्क हनुमानालाच ‘टार्गेट’ केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत अलवर येथील जाहीर सभेला संबोधित करताना हनुमान हे दलित होते, असे वादग्रस्त विधान केले होते. २७ नोव्हेंबर रोजी अलवर येथे भाषण करताना "हनुमान हे वनवासी, वंचित आणि दलित असल्याचा दिव्य शोध “ आदित्यनाथानी लावला. एवढे निम्मीत्त पुरे होते की अचानक हनुमानाचे जात शोध व जात जाहीर करण्याची स्पर्धा ही त्यांचे शेपटा प्रमाणे इतकी वाढत गेली की खुद्द हनुमान गोंधळला असेल की आपण नक्की कोण आहोत ! 
आदित्यनाथ याचे नंतर तर हनुमान कुठल्या जातीचे ही सांगण्याची चढाओढ सुरु झाली. त्यात पहिली हनुमान उडी घेतली, ती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे (एनसीएसटी) अध्यक्ष नंद कुमार साय आणि भाजप खासदार उदित राज यांनी.‘हनुमान हे आदिवासी असल्याचे’ त्यांनी जाहीर केले.पतंजलीचे प्रसिद्ध व्यापारी बाबा रामदेवसेठ यांनी हनुमान अष्ट सिद्धिचे ज्ञाता असून ते क्षत्रिय होते हा दिव्य शोध लावला.केंद्रीय मंत्री सत्यपाल सोंघ यांनी हनुमान हे दलित नव्हे आर्य असल्याचे विधान केले.शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हनुमान हे ब्राम्हण असल्याचे जाहीर केले. भाजप नेता व राज्यसभा सदस्य गोपाल नारायण सिंह ह्यांनी तर कहरच केला "हनुमान हे वानर होते आणि वानर हा पशु असल्याने त्याचा दर्जा दलिता पेक्षा पेक्षा खालचा असून श्रीरामानी त्यांना दैवत्व बहाल केले आहे”.हे सांगून जातपुराणात अधिकच गोंधळ निर्माण केला.
सर्वात मोठा कहर केला तो भाजप आमदार बुक्कल नवाब ह्यांनी.हनुमान हा मुसलीम होता असे धक्कादायक विधानच आमदार बुक्कल नवाब ह्यांनी केले.हनुमान मुस्लिम होता हे सांगताना मुसलमानाची नावे रहमान, रमजान, फरहान, सुलेमान, सलमान, जिशान, कुर्बान अशी ठेवली जातात.सबब हनुमान हे नाव देखील मुसलीम आहे,असा दावाच त्यांनी केला.हनुमान दलित असल्याचे वादावर बोलताना आमदार बुक्कल नवाब ह्यांनी "हनुमानाची जात कंची" ह्या वर चर्चा करताना हनुमानाचा धर्म देखील चर्चीला पाहिजे असा आग्रह केला." माझ्या मते हनुमान मुसलीम असल्याने मुसलीम सधर्मिय नावांशी मिळते जुळते नाव हनुमान असल्याचे," त्यांनी निक्षून सांगितले.
प्रसिद्ध माजी क्रिकेटर चेतन चव्हाण ह्यांनी त्या पुढचा टप्पा गाठला.उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका क्रीडा कार्यक्रमात बोलताना त्यांनी, 'हनुमानजी कुश्ती लड़ते थे, वह खिलाड़ी भी थे' हे सांगून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. उत्तर प्रदेश सरकार चे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी ने विधान परिषद प्रश्नोत्तराच्या वेळी "हनुमान जाट असल्याचा शोध लावला".चौधरींनी ह्या साठी दिलेला तर्क अत्यंत चमत्कारी आहे. ‘दूसरों के फटे में जो टांग अड़ाता है, वही जाट हो सकता है। हनुमान मेरी जाति के थे।’  लक्ष्मी नारायण चौधरी हे स्वतः जाट समुदायाचे आहेत. त्यांचे ह्या वक्तव्यावर विरोधकांनी अख्ख सभागृह डोक्यावर घेतले नसते तर नवलच होते.
ह्या विवादात कुठलाही राजकीय पक्ष मागे राहायला तयार नव्हता.हिंदुस्तान टाइम्स सोबत बोलताना सपा राष्ट्रीय महासचिव राम शंकर विद्यार्थी यांनी आरोप केला कि ‘भाजपा नेता भगवान हनुमान को दलित या मुस्लिम बताकर उन्हें नीचा दिखाने की कोशिश कर रहे हैं "हे सांगताना सपा नेता राम शंकर विद्यार्थी यांनी हनुमान याच क्षेत्राचा राजा असल्याने ते 'गोंड' राजा होते, असा दावा केला.धार्मिक ग्रंथात देखील 'हनुमान गोंड राजा असल्याचा उल्लेख आलेला आहे, हे देखील आवर्जून नमूद केले.
आणखी एक माजी कसोटीपटू कीर्ति आजाद यांचा दावा तर अख्या विश्वाला दिवसा तारे दाखविणारा ठरला, 'हनुमानजी चीनी थे.हर जगह यह अफवाह उड़ रहा है कि चीनी लोग दावा कर रहे हैं कि हनुमान जी चीनी थे.' घ्या आता ! त्यांचे ह्या दाव्या नंतर चीन सरकार शॉक आहे की, हा दावा नेमका कोणत्या चिनी नेत्याने केला आहे? मंकी मास्टर नावाचे सिनेमे चीन मध्ये बनविले जात असतात.त्या मुळे की काय चीन सरकारने मंकी मास्टर्स पात्र असलेल्या सिनेमात हा शोध घेण्या कामी गुप्तहेर लावलेत अशी चर्चा सुरु आहे.
हुनुमानाच्या जात व धर्मावर सुरु झालेली जुमलेबाजी आता केवळ हनुमाना पुरती सीमित राहिली नाही, तर ती आता हनुमानासह रामायणातील इतर पात्रा पर्यंत पोहचली आहे. भाजपा नेता आणि उत्तर प्रदेश अंबेडकरनगरचे खासदार हरिओम पांडे ने दावा केलाय की," हनुमान ‘ब्राह्मण’ थे, वहीं वानर साम्राज्य के राजा सुग्रीव ‘कुर्मी’ जाति से थे। सुग्रीव के भाई बाली  ‘यादव’ थे। सीता को रावण से बचाने की कोशिश करने वाला पक्षी जटायु एक ‘मुस्लिम’ था। साथ ही भगवान राम को समुद्र में राम सेतु बनाने में मदद करने वाले नल और नील ‘विश्वकर्मा’ समुदाय के थे." हरिओम प्रसाद पांडे ह्यांनी 'चुलबुल पांडे' टाईप दबंग स्टाईल दंड ठोकत दावा केलाय की, ही सर्व त्यांची 'रिसर्च ' असून ते ह्या सर्व पात्रांच्या जात सिद्ध करू शकतात!
अश्या असंख्य जेम्स बॉण्ड टाइप शोधा नंतरही भाजपला तीन राज्यात सत्ता गमवावी लागली.जातीचे राजकिय तुष्टीकरण कुणाच्याही पचनी पडले नाही.कुणालाच ह्या गोष्टीत रस नव्हता की रामायणातील पात्र कोणत्या जातीचे होते ? तर मागील वर्षभरात मारले गेलेले अनेकजण गौरक्षेच्या नावावर मारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व मुसलीमच होते.शम्भूनाथ रैगर ह्याने धर्माच्या नावावर क्रूर पद्धतीने केलेला खून व पेटविलेला मृतदेह, असंख्य अत्याचाराच्या कहाण्या, रसातळी गेलेली अर्थव्यवस्था,वाढते बेरोजगारांचे जथ्थे, प्रचंड वाढलेली गुन्हेगारी, जनतेच्या आयुष्याचं झालेले वाळवंट."पधारो म्हारो राजस्थान" हे भीतीदायक आवाहन वाटावं इतका आमूलाग्र बदललेला  राजस्थान, व्यापम घोटाळा व त्यासाठी मारले गेलेले अनेक जण असे ज्वलंत मुद्दे असल्याने, भाजप राजवटीच्या काळ्या बाजूची चर्चा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक हुनुमानची जात, राममंदिर विवाद सुरु करण्यात आले.भाजपवाल्यानी ठरवून जातीचे कार्ड खेळलं होतं.दुर्दैव म्हणजे ह्या देशातील पुरोगामी समजल्या जाणा-या विद्वानांना ह्यात काहीही वावगं वाटलं नाही.हा मोठा धोका देशापुढे आहे.भाजपवाले सत्तेच्या सारीपाटावर पराभूत झाले असले तरी आगामी काळात निवडणुकात ते किती खालची पातळी गाठू शकतात आणि काँग्रेस देखील कशी हिंदुत्व धार्जिणी झालीय हे आता लपून राहिले नाही.
@ राजेंद्र पातोडे,
अकोला
९४२२१६०१०१

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

आंबेडकरी बांधवांनो मनुवादी पॅटर्न लक्षात घ्या...!

- भास्कर भोजने

     सत्तेसाठी साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर करून सत्ता हस्तगत करणे हा मनुवादी पॅटर्न आहे...!
    साम ,दाम, दंड, भेद यापैकी भेद या अस्त्राचा वापर मनुवादी कसे करीत आलेले आहेत त्याची उजळणी करु या आणि आजच्या परिस्थितीत  मनुवादी मंडळीचा मनसुबा समजून घेऊ या....!
       प्रतिक्रांतीवाद्यांनी आधुनिक काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कांऊटर करण्यासाठी सर्वात पहिला अटॅक केला होता लंडन येथील गोलमेज परिषदेत,म. गांधी म्हणाले होते की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी नाहीत तर मीच खरा दलितांचा कैवारी आहे....!
    जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या हक्कांसाठी लढा द्यायला उभे राहिले तेव्हा ख-या प्रतिनिधीला बाजूला सारून बुजगावणे उभे करणे हा मनुवादी अजेंडा आहे,त्याचाच हा प्रकार.परंतु भोळ्या भाबड्या आणि अशिक्षित जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनला तारा पाठविल्या आणि आपला खरा नेता कोण हे इंग्रजांच्या लक्षात आणून दिले...!
     म्हणूनच दलित, समुहासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जातियनिवाडा मिळवू शकले....!
    तेव्हा पासून सच्चा आंबेडकरवादी नेता आंबेडकरी जनतेला मिळू नये म्हणून संभ्रम निर्माण करण्यासाठी मनुवादी,नेहमी नेतृत्व म्हणून बुजगावणे उभे करीत आले आहेत....!
   आता आपली म्हणजे, आंबेडकरवादी,संविधानवादी, मानवतावादी, समाजवादी विचारांच्या मंडळीची जबाबदारी आहे की,खरा आणि मनुवाद्यांनी लादलेला नेता यातील फरक समजून घेणे आणि खरा संविधानवादी नेता निवडणे....!
     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रिप्लेस करुन जगजीवनराम सारखे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने केला आणि अनु.जातीला एकसंघ आलें नाहीं पाहिजे म्हणून भेद नितीचा अवलंब केला...!
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें नंतर रिपब्लिकन पक्षाचे सत्तेकडे जाण्याचे वा प्रबळ विरोधी पक्षाचे उद्दिष्ट साध्य होऊ नये म्हणून, मनुवादी मंडळीने १९६७ मध्यें ऊत्तर प्रदेशात सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते संघप्रिय गौतम आणि बी.पी.मौर्य यांच्या पैकी बी.पी.मौर्य यांना रिपब्लिकन पक्षातुन फोडले आणि मंत्रीपद दिले व रिपब्लिकन पक्ष गारद केला...!
महाराष्ट्रात कर्तबगार रिपब्लिकन नेतृत्व म्हणून दादासाहेब गायकवाड तयार झाले तेव्हा रा.सु. गवई सारख्या एका व्यक्तीला सर्वच काही देऊन कॉंग्रेस पक्षाने रिपब्लिकन पक्षाचे लाचार बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्ष नेस्तनाबूत केला...!
    तोच पायंडा पुढेही मनुवादी कॉंग्रेस पक्षाने सुरु ठेवला, जेव्हा १९८० च्या दशकात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचें नेतृत्व उभे राहिले तेव्हा शरद पवारांनी रामदास आठवले हे बुजगावणे तयार केले आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भेद नितीचा अवलंब केला आहे...!
    रिपब्लिकन चळवळीला मनुवादी मिडियाने लादलेले नेते म्हणून अनेक जण तयार केले आणि सत्तेची चटक लावली.ही सुरुवात कॉंग्रेस पक्षाने केली आहे ,सत्तेच्या मोहापायी, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे,चंद्रकात हंडोरे, नितिन राऊत, मुकुल वासनिक, दादासाहेब रुपवते,एन.एम.कांबळे, बाळकृष्ण वासनिक,नाशिकराव तिरपुडे आणि असेच काही जण...!
   हे नेते नव्ह्ते तर कॉंग्रेस किंवा मनुवादी मंडळीने तयार केलेले बुजगावणे होते...!
    एका बाजुने सत्तेची चटक लावली तर दुस-या बाजूने क्रांतीवादी विचारांच्या पक्षाला भेद नितीने सुरुंग लावला होता...!
    काल कॉंग्रेस पक्ष मनुवादी विचाराचे कार्य करीत होता आज पक्षाचे नांव बदलले आहे.कॉग्रेसची जागा भाजपाने घेतली आहे...!
   कॉंग्रेस असो की, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भाजप असो की, शिवसेना एकाच ध्येयाने ते क्रांतीवादी विचारांच्या पक्षांना परास्त करण्यासाठी झटतात...!
    आता नवे भिडू बुजगावणे म्हणून तयार केले जातं आहेत...!
    मिडिया अगोदर असा बनाव तयार करते की,अमुक एक तरुण विचाराने सच्चा आंबेडकरवादी आहे आणि मग त्याला नेता म्हणून प्रपोज केले जाते...!
      चंद्रशेखर आझाद(रावण) हा तरुण ऊत्तर प्रदेशात त्याचे सामाजिक कार्य आहे...!
   तो नेमका महाराष्ट्रात काय करतो आहे आणि तेही निवडणूका जवळ आल्या असता...??
     आंबेडकरी तरुणाला आणि ऊत्तर प्रदेशातील तरुणाला महाराष्ट्रात मिडिया एवढी कव्हरेज का देतं आहे...??
   आता निवडणुका जवळ आल्या असता मनुवादी षंढयत्र रचुन आपलं इशिप्त साध्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत...!
   चंद्रशेखर आझाद (रावण) हा लादलेला नेता मनुवादी आपल्यावर लादतं असतील आणि नवं बुजगावणे तयार करीत असतील तर आमची जबाबदारी ही मोठी आहे...!
    मनुवादी भेद नितीचा पाडाव करण्यासाठी जुना अनुभव लक्षात घेऊन आमची तयारी अशी असली पाहिजे की,ज्याला मनुवादी मिडिया जास्त कव्हरेज देते आहे तो मनुवादी आहे,बूजगावणे आहे हे चटकन लक्षात घेतले पाहिजे...!
     आत्ता यापुढे नवे नवे भिडू तयार करुन बुजगावणे आमच्या समोर मांडल्या जातील...!
   बुजगावणे भिरकावून लावण्याची कुवतं निर्माण करु या...!
   आमच्या अल्पशिक्षित आणि भोळ्या महारांनी १९३२ साली लंडनला तारा पाठवून म.गांधी हा आमचा नेता नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे खरे नेते आहेत असा खंबीरपणा आणि बौद्धिक हुशारी दाखविली व भविष्य सुरक्षित केले....!
   आत्ताही तशीच बौद्धिक हुशारी आणि क्रांतीदर्शी विचाराने मनुवादी भेदनितीचा पाडाव करायचा आहे....!
   भाजपने बूजगावणे तयार करुन निवडणुकीत संभ्रम निर्माण करणं सुरू केलं आहे... सावधान.
    या भाजपच्या भेदनितीचा पाडाव करु,तसेच याचं नितीचा वापर करून कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काही मोहरे वापरुन आपल्यावर चालं करु शकते ढोंगी सेक्युलॅरिझमचे सोंगाडे काहीही करु शकतात म्हणून अखंड सावधान राहून निवडणूकीला सामोरे जाऊ या....जय वंचित बहूजन आघाडी.
  जयभीम.

-भास्कर भोजने.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...