Friday, 10 May 2019

वंचीतांचा एल्गार महताब होवो...

वंचीतांचा एल्गार महताब होवो...   

-राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता 

गेली अनेक वर्षे  महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ जन्माला घालनारे एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचीत बहुजन आघाडीच्या निम्मीतीने डिप्रेस/ सप्रेस क्लासेसच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.आज साहेबांचा वाढदिवस आहे. हा दिवस राज्यभरात स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवसाला एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ओझरता आढावा घेणे संयुक्तिक ठरेल.बाळासाहेब आणि त्यांची चळवळ ही प्रबंधाचा विषय आहे, त्यामुळे केलेली मांडणी ओझरती आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 


 अशी झाली सुरुवात ... 


 १९८० साली सामाजिक क्षेत्रातून कार्यकर्ता  म्हणून सुरुवात करणा-या बाळासाहेबांचा जन्म १० मे १९५४ चा आहे.त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट सँटेनिस लेंस हायस्कुल मुंबई मध्ये तर उच्च शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात  झाले.आपल्या आजोबांच्या नावावर वारस म्हणून येणा-या नेतेपणाच्या तकलादू बाबी टाळून एक कार्यकर्ता म्हणून मला चळवळ करण्याचा अधिकार आहे, असे ठरवून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरूवात केली. १९८२ साली मुंबईत बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात त्यांनी सम्यक समाज आंदोलन स्थापन झाल्याची घोषणा केली.बाबासाहेबानी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात बहिष्कृत हितकारीणी सभेपासून केली होती.बाळासाहेबांनी बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. इतिहासाला कलाटणी देणारा हा दिवस ठरला.


बाबासाहेबांचा शेडूलड कास्ट फेडरेशन पक्ष नुसता दलीतांचा नव्हे तर सर्व भारतीयांचा असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.त्यांचे हयातीत पक्ष स्थापन होऊ शकला नाही.त्यांचे महापरिनिर्वाणा नंतर स्थापन झालेला पक्ष पुन्हा एक जातीय आणि एककल्ली ठरला होता.नेतृत्वाचे वाद, अनेक गटाचा उदय आणि १९७० च्या दशकात उदयास आलेले दलित पँथरचे वादळ १९७७ साली शमले होते.त्यातही १९७७ साली  'भारतीय दलित पँथर' निर्माण झाले.परंतु समाजाला एकसंघ पक्ष नव्हता , नेतृत्व उभे झाले नव्हते.बाळासाहेबांनी सम्यक समाज आंदोलनाचे माध्यमातून २ मार्च १९८३ रोजी नाशिक मधून स्त्रियांचे प्रश्न, भूमिहीन शेतकरी शेतमजुरांच्या साठी मुंबई विधान भवनावर पायी मोर्चा काढला.मराठवाडा विषयापीठाचे नामांतर झाले पाहिजे.वाढत्या महागाईला विरोध, भूमिहीन शेतमजुरांना पडक्या जमिनी देण्यात याव्यात,नवबौद्ध आणि आदिवासींना सवलती देण्यात याव्यात ह्या मोर्च्याच्या मागण्या, दादासाहेब गाईकवाडांच्या भूमिहानाच्या लढ्याची आठवण करून देणारे आंदोलन होते.ह्यातून आंबेडकरी चळवळीने एकजातीय राजकारणातून मुक्त होऊन सर्वसमावेशक प्रश्नावर लढण्याची सुरुवात केली.


शेकाफे व रिपब्लीकन पुढा-यांनी पक्ष आणि स्वतःचे नेतृत्व काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. त्या मुळे महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचारांनी उचल खाल्ली होती.प्रभावहीन झालेल्या चळवळीला उभारी देण्यासाठी बाळासाईब आंबेडकरांनी  २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्ध्यर्थ विहार वडाळा येथे काही समविचारी मंडळींना निमंत्रित करून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णयावर सखोल चर्चा केली.आणि ६ मी १९८४ साली पूणे येथील नानापेठेतील अहिल्याश्रम येथे अधिवेशन बोलाविले.ह्याच अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या राजकीय पक्षाची बांधणी केली.ह्या अधिवेशनाचे वैशिष्टय म्हणजे ह्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मिनाबाई गायकवाड ह्यांनी भूषविले होते.सम्यक समाज आंदोलन ते भारतीय रिपब्लिकन पक्ष हे आवर्तन पूर्ण झाले होते. 

१९८३ मध्ये त्यांनी शेतक-याचा गायरान जमिनीचा लढा उभा केला.वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी गायरान जमिनीसाठी मोर्चा काढला.हे मोर्चे आंदोलन सुरु होते, भुमिहीनांचे मोर्चे काढल्याने १४ एप्रिल १९९० साली सुधाकरराव नाईक मंत्री मंडळाने गायरान जमिनीचा शासन निर्णय बाळासाहेबांचे नावाने काढला आणि गायरान जमिनी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला, भूमिहीनाना जमिनीचे पट्टे मिळाले. 

 


 अकोला जिल्ह्याचा ऋणानुबंध  –


१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू एड. बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यातील सर्किट हाऊस येथे प्रथमच आगमन झाले होते. कृष्णा इंगळे व एक रेल्वे कर्मचारी त्यांचे सोबत होते.नगर परिषद येथे आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील व भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यातून सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली.रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभेची निश्चिती झाली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातूच मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थातच त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.

दरम्यान अकोला जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात.ह्या पहिल्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या ,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ....” सभा स्तब्ध झाली, मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला. जनतेच्या डोळ्यात अश्रू तराळले.टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘अकोला पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ३८ बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.

या प्रसंगा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर घेतली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले आणि खिशात पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नसताना केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत अकोला जिल्हा बांधू लागले, गाजवू लागले.

तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.त्या मुळे हे तरूण आंबेडकर पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.


भारिपचे विलीनीकरण .. 


१९८५ साली त्यांनी ऊस उत्पादक शेतका-या साठी पूणे ते माणगाव लॉंगमार्च काढला.साखर कारखाने केंद्रबिंदू न धरता ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी असावा ही मुख्य मागणी होती.ह्या आंदोलनामुळे शेतक-यांना उसाला योग्य भाव मिळाला आणि साखर कारखान्यातील राखीव जागा भरल्या गेल्या. 

महाराष्ट्रातील विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून एक प्रचंड मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी १९९० साली अकोला जिल्हा निवडला.१९९० साली मूर्तिजापूर विधानसभेत अपक्ष उभे असलेल्या मखराम पवारांना पाठिंबा देऊन निवडून आणले.हा बहुजन समाजाच्या विजयाचा मानदंड ठरला."बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेवू" हा नारा बुलंद झाला.पवारांच्या विजया मुळे प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करता येते हे आत्मभान बहुजन समाजाला प्राप्त झाले.२३ ऑगस्ट १९९० साली अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.बहुजन समाजाचे स्वतंत्र संघटन उभे करणे हा त्या मागील मूळ उद्देश.ह्या मेळाव्यात "अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची" स्थापना झाली, याच अधिवेशनात अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघ हा भारिप सोबत राजकीय आणि सामाजिक वाटचाल करेल हे ठरविण्यात आले.

त्यातूनच बहुजनांच्या सत्तेचा स्वबळाचा मार्ग यशस्वी करणारा 'अकोला पॅटर्न' जन्माला आला.हाच बाबासाहेबानी अपेक्षिलेला रिपब्लीकन पक्ष होता. 

बहुजन महासंघाच्या स्थापने नंतर भारिप बहुजन महासंघाच्या विलीनीकरणाचा पहिला एपिसोड पार पडला तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील अधिवेशनात.२१ मार्च १९९३ साली शेगांव येथे बहुजन महासंघाचे अधिवेशन मखराम अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.ह्या अधिवेशनाला  बाळासाहेब आंबेडकर उद्घाटक होते.प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलावंन्त निळू फुले आणि राम नगरकर प्रामुख्याने उपस्थित होते.ह्याच अधिवेशनात भारिप आणि बहुजन महासंघाचे विलीनीकरण झाले.हे दलितांच्या राजकीय सामाजिक चळवळीचे दुसरे आवर्तन नव्या आयामाला जन्म देत होते. एकजातीय, एक धार्मीय राजकीय कूस त्याने मोडून निघाली.

भारिप बहुजन महासंघाच्या उदयाचे पहिल्या टप्यात बाळासाहेबांचे नेतृत्वातील भारिप बमसंने आपला पहिला आमदार नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये भीमराव केराम ह्यांचे रुपाने निवडून आणला.आणि बघता बघता बहुजनाना सत्तेची दालने बाळासाहेबांनी उघडी करून दिली.ह्या नंतर महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला.त्यातून अनेक लहान लहान घटकांना विविध ठिकाणी सत्तेची पदे मिळालीत.विविध आंदोलने आणि मोर्चे ह्यांनी तो काळ प्रचंड गाजला होता.त्यात खो घातला तो शरद पवारांनी, भारिप बमसंचा पहिला आमदार फोडण्या पासून ते सत्तेतील भारिप बमसंचे मंत्री फोडण्याचे काम पवारासोबत काँग्रेसने केले. त्या वेळी बाळासाहेबांनी दिलेले भाषण शरद पवारांना मोठा धडा होता, " तुम्ही माझे मंत्री आमदार पळवू शकता, परंतु जनता नाही ".हे वाक्य प्रचंड आश्वासक होते. मराठवाडा विध्यापीठाचे नामांतर असो की रिडल्स बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांवर किंवा काँग्रेसवर विश्वास ठेवला नाही. 


वंचित प्रयोगाचे दूरगामी परिणाम ... 

आताच्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी ही राजकीय चमत्कार आहे.२४ मार्च २०१९ रोजी नोंदणी झालेला पक्ष राज्यात ४८ जागा स्वबळावर उभ्या करून लढतो काय आणि कुणीही स्पर्धेत धरत नसताना अल्पावधीत राज्यात प्रस्थापित पक्षांचा विरोधात तिसरा सक्षम पर्याय निर्माण होतो काय, सर्वच अनाकलीय आहे.प्रस्थापित राजकीय घराणी आणि पक्ष व नेत्याच्या उरात धडकी घडविणारी ताकद बाळासाहेबांनी वंचीत बहुजन आघाडीच्या रूपाने उभी केली आहे.सर्व बहुजन समाजाने देखील हा पक्ष आणि नेता स्वीकारला आहे.त्यामुळे आता खरे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता वंचीताचा उत्कर्ष होईल. बाळासाहेबांचे नेतृत्वात लोकसभेच्या ह्या दमदार प्रदर्शना नंतर विधानसभेत वंचीतचे ४० प्लस आमदार असतील ह्यात मला कसलीच शंका नाही. 

बहुजनांच्या राजकीय सामाजिक चळवळीचा वेलू लोकसभा आणि विधानसभेच्या मांडवावर नेणा-या बहुजन नायक एड बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसा निमित मंगल कामना.       

              

राजेंद्र पातोडे

(प्रदेश प्रवक्ता) 

वंचीत बहुजन आघाडी 

महाराष्ट्र प्रदेश 

९४२२१६०१०१

Tuesday, 7 May 2019

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर

वंचितांच्या राजकारणाचा सर्वव्यापी अवकाश: अँड.बाळासाहेब आंबेडकर 

डॉं.बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत दलित समाजात त्यांच्या तोडीचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक समज असणारं सर्वव्यापी नेतृत्व उभं राहू शकलं नाही. शेवटी शेवटी बाबासाहेबांना ही जाणीव फार छळायची. इतक्या कष्टाने इथवर आणलेला हा गाडा पुढे घेवून जाणारा कुणी द्रष्टा कार्यकर्ता आसपास दिसत नव्हता. म्हणून किमानपक्षी मागे तरी घेवून जावू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. झालेही तसेच. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर देशात कुळ कायद्याची चर्चा होत होती. तेंव्हा कसेल त्याची जमीन पण नसेल त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेली भूमिहीनांची चळवळ वगळता देशाच्या राजकारणाला रिपब्लिकन नेतृत्वाची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या व्यापक चळवळी आणि सर्वव्यापी नेतृत्व उभे राहिले नाही. त्या नंतरचे बहुतांश आंबेडकरी राजकारण भावनिक आणि अस्मितेच्या मुद्द्याभोवती फिरत राहिले. मधल्या काळात दलित पँथरने देशभरात झंझावात निर्माण केला होता. दलितांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला प्रखर विरोध करत सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्ध मोठे बंड पुकारले होते. ती त्या काळाला दिलेली प्रतिक्रिया होती. दशकभराच्या आतच तीही संपुष्टात आली. त्यानंतर तब्बल १६ वर्षं नामांतराचे आंदोलन चालले. त्यात आंबेडकरी तरुणांची जवळ जवळ एक पिढी खर्ची पडली. मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातील संपूर्ण दलित समाज अक्षरशः होरपळून निघाला. त्याचे फलित काय? तर फक्त नामाविस्तार ! त्यानंतर सामाजिक चळवळी मंदावत गेल्या आणि हळूहळू दलित चळवळींमधली दाहकता देखील कमी होत गेली.


या संबंध पार्श्वभूमीवर अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आकार घेत होते. डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आयत्या वंशाचे राजकारण त्यांना खेळता आले असते. पण तसे न करता आधी त्यांनी स्वतःतल्या नेतृत्व गुणांचा विकास केला. बाबासाहेबांप्रमाणे कायद्याचे पंडित आणि घटनेचे जाणकार बनले. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या ज्ञानशाखांसोबतच भाषा- साहित्य- संस्कृती – धर्म – जात - वर्ग -वर्ण- लिंग यांचा खोलवर अभ्यास केला. राजकारणाआधी समाजकारण सुरु केलं. इ.स. १९८३ च्या ६ दिवसाच्या लॉंगमार्चने  आंदोलनाला सुरवात केली. अस्मिता आणि भावनिकतेचं राजकारण नाकारून रिडल्स, गायरान जमीनी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी व्यवस्थापन, भ्रष्टाचार असे भौतिक प्रश्न घेऊन व्यापक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचं राजकारण केवळ दलीतांपुरतं मर्यादित नाही. शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी ,ओबीसी ,भटके विमुक्त, अल्पसंख्य, स्त्रिया या सर्व घटकांना सोबत घेवून शोषित वंचितांची एक मोठी मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु प्रस्थापित राजकारण्यांनी गेल्या साठ वर्षात जे राजकारण उभं केलं आहे त्याचा सांगाडा लोकशाहीचा असला तरी आत्मा जातशाही-धर्मशाही आणि भांडवलशाहीचा आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनात अजूनही लोकशाही रुजू शकली नाही. राजकारणाचे सगळे ठोकताळे जातीने बांधले जातात. आज जातीव्यवस्था ही राजकारणाची गरज बनलेली आहे. अशावेळी बाळासाहेब आंबेडकर जातीअंताचा अजेंडा घेवून जातीनिरपेक्ष राजकारण करत असतील तर त्यांच्या पाठीमागे नेमकी कोणती जनता उभी राहणार आहे हा खरा प्रश्न आहे. आरक्षणाने बुर्ज्वा बनलेला आंबेडकरी मध्यमवर्ग त्यांच्या पाठीमागे येणार नाही. कारण अनुसूचित जातीअंतर्ग आरक्षणाची वर्गवारी ते अजिबात मान्य करत नाहीत आणि बाळासाहेब नेमके त्यालाच सहमती दर्शवित आहेत. अशावेळी रीपब्लीकनचे छोटे छोटे तुकडे वाटून घेवून त्यावर पोट जाळणारी मंडळी या गोष्टीचं भांडवल करणार नाहीत तर नवलच! दुसरीकडे अनुसूचित जातीतील नव बौद्धेतर जाती बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या जातीतील नेतृवाखाली उभ्या आहेत. तसाच प्रकार एसटी, एनटी, ओबीसी प्रवर्गातील सगळ्या जातींमध्ये आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षांनी याधीच प्रत्येक जातीत आपापलं नेतृत्व पेरून ठेवलं आहे. भाजप देखील आता तिच नीती अवलंबतो आहे. कारण त्यांना पक्कं ठाउक आहे, कि जातशाही आणि भांडवलशाही एकत्र आल्यावर मतदार बाहेर जात नाही. भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या त्यांना बांधून ठेवता येतं. त्यामुळेच भौतिक प्रश्नांची लढाई लढणारे राजकारणी इथं निवडून येणं आणि प्रस्थापित होणं ही अत्यंत दुरापास्त गोष्ट बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं सर्वसमावेशक लोकशाहीवादी राजकारण समजून घेणारा आणि अमलात आणणारा सुजाण वर्ग कितीसा आहे ? मराठा क्रांती मोर्चावेळी दलितांना प्रतीमोर्चे काढू नका असं म्हटल्याने त्यांचं कौतुक करणारे मराठे आज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील का हाही प्रश्नच आहे.

भारतातल्या शोषण व्यवस्थेची मूळं बाळासाहेबांना पक्की ठाऊक आहेत. संघाने पेरलेल्या हिंदुत्ववादाच्या विषाची फळं आज भाजपच्या रूपाने भारतीय राजकारणाला लगडलेली आहेत. भाजपाने देशाला पाच वर्षात पन्नास वर्ष मागे नेले. अजून पाच वर्ष मिळाली तर देशाचा सिरीया झाल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा हे विष लवकरात लवकर नष्ट केलं पाहिजे. पण गेल्या नव्वद वर्षापासून सातत्याने पसरणारं हे विष असं अचानक नष्ट करणं एकट्या दुकट्या पक्षाचं काम नाही. त्यासाठी थोडेफार सेक्युलर थोडेफार लोकशाहीवादी असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. पण उजव्या पक्षांची नीती हिंदुत्ववाद नष्ट करणे नसून हिंदुत्ववाद्यांच्या हातातील सत्ता मिळवणे एवढीच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादाला विरोध हे त्यांचे साधन राहिले आहे, साध्य नव्हे. सत्तेसाठी ते हिंदुत्ववाद्यांनाही विनाशर्त पाठींबा देवू शकतात हे आपण मागे अनुभवलेच आहे. सत्तेसाठी थुका चाटणाऱ्या या मत्सुद्यांचा काही भरोसा नसतो. ते कधीही पलटी मारू शकतात. बाळासाहेब मत्सुद्दी राजकारणी नाही, तर अभ्यासू राजकारणी आहेत. त्याहीपेक्षा अधिक विचारवंत आहेत. सामाजिक न्याय व मानवी अधिकारांसाठी लढा उभारणारे ते लढवय्ये नेते आहेत. तेच खरे बाबासाहेबांच्या सर्वव्यापी विचारांचे, बौद्धिक गुणांचे वारसदार आहेत. बाबासाहेबांचा गाडा पुढे घेवून जाण्याची क्षमता केवळ त्यांच्यात दिसते आहे. आज या देशातली लोकशाही आणि संविधान फार मोठ्या संकटात आहे. आपण त्यांच्या मागे सर्व ताकदीनिशी उभे राहिलो नाही तर नवी पेशवाई येण्यास उशीर लागणार नाही.  

बाळासाहेबांचा अजेंडाच शोषणाचं,विषमतेचं मूळ असणाऱ्या हिंदुत्ववादाच्या विरोधात आहे. देशाला हिंदुत्ववादाच्या जोखडातून मुक्त करणारं हे एकमेव नेतृत्व आहे. भिमाकोरेगावच्या दंगलीनंतर त्यांनी जाहीरपणे घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधी भूमिकेमुळे संघ भाजप प्रचंड खवळले आहे. त्यांना नक्षलवाद्यांचे समर्थक ठरवून बदनाम करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. हिंसेने हिंसा वाढते, नक्षलवादाचं मूळ असणारी व्यवस्था नष्ट करा, नक्षलवाद आपोआप नष्ट होईल असं म्हणणं नक्षलवादाचं समर्थन ठरतं काय ? यावर आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, भाजप ही त्या दहशतवादी संघटनेची शाखा आहे. त्यामुळे भाजप समर्थक तो दहशतवादाचा समर्थक ठरतो असा युक्तिवाद करता येतो. पण उलट मागे काही मूर्ख दलित ब्राम्हणवाद्यांनी आनंद तेलतुंबडे, मिलिंद तेलतुंबडे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे नाते जोडणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून त्याचा नक्षलवादाशी संबंध जोडला होता. हे असले प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याला ताबडतोब उत्तर देणे गरजेचे आहे. बाळासाहेबांकडे पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीत. त्यांना पोसण्यासाठी सहकारी साखर कारखाने, दुध डेर्या, बँका नाहीत. आर्थिक रसद पुरवणारे व्यापारीही नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पगार देणे, सभांसाठी लाखो रुपये खर्च करणे त्यांना शक्य होत नाही. आपल्याकडे पैसा नाही पण बाबासाहेब आहेत, ज्ञानाची, विचारांची श्रीमंती आहे, शिक्षण आहे, लढाऊ बाणा आहे, व्यवस्थेला अंगावर घेण्याची ताकद आहे. ही सर्व ताकद आज बाळासाहेबांच्या पाठी उभी करणं ही आपलीच नव्हे तर लोकशाहीची गरज आहे.  

प्रा.सुदाम राठोड


साभार - मित्रवर्य Sudam Rathod

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...