डाव्यांचे उजवे रंग - सुमित वासनिक.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतांना या सरकार मधील सरंजाम आणि जातीय राजकारण्यांनी उच्छाद मांडलेला होता. दलित, आदिवासी अत्याचार आणि भ्रष्टाचाराची रोज नवीन प्रकरणे उघड होत होती. अश्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधात ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी आणि CPI, CPM सारख्या डाव्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. ही आघाडी 2018 पर्यंत कार्यरत होती. पण 2018 मध्ये भंडारा मतदारसंघातील निवडणुकिवेळी CPI या पक्षाने भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास समर्थन देऊन आपला प्रवास डावी कडुन उजवी कडे सुरू केला असल्याचे आपण पाहत आहोत.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडी तयार झाली होती त्या हेतुलाच हरताळ फासत CPI ने भंडारा निवडणुकीत खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले. भंडारा निवडणुकी नंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संविधान बचाव रॅलीत CPI आणि CPM या पक्षांनी ते पूर्णपणे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहेत असे दाखवून दिले. पुढे CPI आणि CPM या पक्षांनी काँग्रेसच्या महाआघाडी संबंधित बैठकांना हजेरी लावणेही सुरू केले. आपल्या या वागणुकीतून डाव्यांनी आपण आता महाराष्ट्र लोकशाही आघाडी सोबत नाही असा स्पष्ट संदेश दिला. पण काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणी आपली ही भूमिका बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी डाव्यांनी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनि एमआयएम या पक्षा सोबत युति केल्याचे कारण दिले. हे कारण देतांना डावे हुशारीने लपवतात की ओवेसी वंचित बहुजन आघाडीत यायच्या आधीच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जायचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एमआयएमला विरोध करतांना डाव्यांनी स्वतः केरळ मध्ये मुस्लिम लीगच्या सोबत युति करून निवडणुका लढविलेल्या आहेत, मुस्लिम लीग सोबत बसून आपण सत्ता उपभोगली आहे हे CPI आणि CPM हे पक्ष विसरतात. मुळात या पक्षांना एमआयएमचा प्रॉब्लेम नाही, 5-6 वर्षे भारिप सोबत असतांना हे पक्ष आपल्या संघटनेत एकही नवीन माणूस जोडण्यात अपयशी ठरले हे यांचे खरे दुखणे आहे. आपण अपयशी ठरलो आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर आपला पक्ष वाढविण्यात यशस्वी झाले, आपल्याला जे करायचे होते त्याचे अगदी उलटे झाले या जातीयवादी मानसिकतेतूनच डाव्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत संधान साधले आहे. डाव्यांनी काँग्रेस सोबत गेल्यानंतर काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे डाव्यांसोबत एकाही राज्यात युति केली नाही तरीही डावे काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिणे राजकारण सोडण्यास तयार नाहीत यामागील एकमेव कारण म्हणजे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढते राजकीय वजन रोखण्याची जातीयवादी भूमिका हेच होय.
भाजप-सेनेच्या धर्मांध राजकारणापासून देशाला वाचविण्यासाठी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आहोत हे असे डावे पक्ष सांगतात आणि आपल्या या जातीयवादी राजकारणाला लपवू पाहतात, पण सत्य काही केल्यास समोर येतेच. CPI चा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फिरून भाजपपासून देश वाचवायच्या गोष्टी करतो आहे तर दुसरीकडे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर महानगरपालिकेत भाजपला मतदान करून भाजप सोबत बसला आहे. डावे जर खरोखरच भाजप विरोधात असतेतर त्यांनी अहमदनगर प्रकरणी राष्ट्रवादीच्या भूमिकेला विरोध केला असता आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राजकीय संबंध तोडले असते पण डाव्यांनी याविषयी साधा विरोधही दर्शविलेला नाही. डाव्यांना भाजपचे वावडे नाही हे महाराष्ट्रातील CPM चे नेते नरसैय्या आडम मास्तर यांनी सोलापूर येथील प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात हजेरी लाऊन आणि मोदींवर स्तुतीसुमने उधळून स्पष्टच केले आहे. डावे पक्ष एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी आर्थिक आरक्षणावर भाजपला संसदेत समर्थन देऊन ते संविधानाच्या विरोधात असल्याचेही दाखवून दिले आहे. डावे पक्ष एकानंतर एक भाजपला पूरक अश्या भूमिका घेत आहेत आणि त्याचवेळी ते वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा अपप्रचारही करीत आहेत, यावरून डाव्या पक्षांचा जातीयवादी चेहरा खुलून समोर आला आहे.
आंबेडकरी चळवळीत ज्याप्रमाणे अनेक संघटना आणि पक्ष आहेत त्याचप्रमाणे मार्क्सवादी चळवळीतही अनेक संघटना आणि पक्ष आहेत. अनेक डाव्या संघटना आजही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहेत तर CPI आणि CPM हे पक्ष बाळासाहेबांची साथ सोडून सरंजामी भांडवलदारांना शरण गेल्या आहेत. CPI आणि CPM सारखे डावे पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या, ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गेल्याने बाळासाहेबांचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट बाळासाहेबांसोबत असल्यामुळे डाव्या चळवळी बद्दल लोकांना जी आपुलकी वाटायला लागली होती त्या आपुलकीला डाव्यांनी वंचित बहुजन आघाडिला विरोध करून तिरस्कारात परावर्तित केले आहे. हे डाव्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे, येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम यांना भोगावे लागतील. डाव्यांचे समोर आलेले हे उजवे रंग पाहून त्यांनी मानवमुक्तीच्या लढ्यासोबत दगाबाजी केली आहे हे सिध्द झाले आहे, मार्क्सच्या तत्वज्ञानाला या पक्षांनी भांडवली आणि ब्राह्मणवादी पक्षांच्या समर्थनात जुंपले आहे. काळ कोणालाच विसरत नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकि वेळी डांगेंनी घेतलेल्या भूमिका प्रमाणे 2018-19 मधील डाव्यांच्या या भूमिका काळया अक्षरात भविष्याच्या पटलावर ठळकपणे दिसत राहतील आणि डाव्यांच्या जातीयवादी राजकारणाची साक्ष देत राहतील.
