वंचितांनो कॉर्नर मिटिंग हीच आपली शक्ती
- सुमित वासनिक
आंबेडकरी चळवळ ही संसाधन विहिन चळवळ आहे, त्याचप्रमाणे ज्या वंचित समूहाच्या कल्याणाची लढाई ही चळवळ लढते आहे तो वंचित समूह सुद्धा संसाधन विहिन समूह आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत एकीकडे वंचितांना डावलणारे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेने सारखे पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांनी अतिशय बळकट असलेले प्रस्थापित पक्ष आहेत. तर दुसरीकडे पैसा नसलेले आणि प्रसिद्धी माध्यमं विरोधात असलेले आपण वंचित समूह आहोत.
संसाधनांनी परीपूर्ण असलेल्या या प्रस्थापितांना पराजित करून आपल्याला आपल्यासाठी संसदेची दारे उघडायची आहेत. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण विना पैसा आणि प्रसिद्धी माध्यमांचा विरोध असूनही लाखोंच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेऊन दाखवत आहोत, हीच आपली शक्ती आहे. ही आपल्या एकीची शक्तीच या धनदांडग्यांना भुईसपाट करण्यासाठी पुरेशी आहे. आपल्या या अफाट जनशक्तीला आपण मतपेटित पोहचविण्यात यशस्वी झालो तर आपल्याला संसदेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे आपण ओळखले पाहिजे.
जे आपले समर्थक आहेत, आपल्या समविचारी आहेत , वंचित आहेत त्यांना मतदानासाठी तयार करायच्या कामाला आपण सर्वांनी आता लागले पाहिजे. मतदार बनविणे, मतदानासाठी लोकांना तयार करणे यासाठी अनेक मार्गांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे प्रत्येक वाडी, वस्ती, आणि गावखेड्यात काँर्नर मिटिंग, छोट्या सभा घेणे हे होय.
कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा आयोजित करा या सभांच्या माध्यमातून जनतेला सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल अवगत करत रहा. जनतेला मतदानाचे महत्व समजावून सांगा, मतदार तयार करा. निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष पैश्याच्या आणि प्रसिद्धी माध्यमांच्या जोरावर ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि आपल्या उमेदवाराबद्दल अफवा पसरवीतात अश्या अफवांपासून सावध राहण्यासाठी जनतेला या सभांच्या माध्यमातून तयार करा. भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडिबद्दल होत असलेला अपप्रचार खोडुन काढा. निवडणुकीच्या दिवशी लोकं स्वयंस्फूर्तीने आपले मत वंचित बहुजन आघाडिला देतील असे वातावरण या कॉर्नर मिटिंग आणि छोट्या सभांच्या माध्यमातून तयार करा. प्रत्येक 10-15 दिवसांच्या नंतर अश्या मिटिंग ,सभा आयोजित करा. या कॉर्नर मिटिंग, छोट्या सभा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय होय हे लक्षात ठेवा.
मित्रांनो आपल्या कडे कुठलेच संसाधन नाही पण आपल्या जवळ जनशक्ती आहे. या जनशक्तीच्या जोरावरच आपल्याला बदल घडवायचा आहे त्यामुळे आपणच जबाबदारी उचलली पाहिजे आणि आहेत त्या मार्गांचा उपयोग करून मतदार जागृती केली पाहिजे, वंचित बहुजन आघाडिचा मतदार तयार केला पाहिजे. आपण हे करण्यात यशस्वी झालोतर येणारा काळ आपला असेल , समतेचा असेल याची जाणीव असू द्या.