Tuesday, 26 March 2019

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

या गर्दीमागचे कोडेे काय- राजेंद्र पातोडे

आज उभ्या महाराष्ट्राला एकाच गहन प्रश्नाचे कोडे उकलत नाहीय आणि ते म्हणजे वंचीत बहुजन आघाडीच्या प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक लाखोंची गर्दी कशी जमते? जिथे सत्ताधारी आणि विरोधकांना पंचवीस-पन्नास हजार माणसे गोळा करायला घाम फुटतोय, तिथे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला सलग जमणारा लाखोंचा जनसागर येतोच कसा हा यक्ष प्रश्न सध्या देशातील मनुवाद्यांची झोप उडवीत आहे.बरं ह्या ‘मास चा एकच क्लास आहे’ असेही नाही.अगदी उच्च शिक्षित, गर्भ श्रीमंत, उद्योजक व्यापारी, वकील, प्राध्यापक, इंजिनीयर,आयटीयन्स पासून ते थेट कलावन्त,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी – शेतमजूर ते अगदी सामान्य माणूस अगदी तृतीयपंथी देखील ह्या सभेला आवर्जून हजर असतात.प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि गुप्तचर खातं देखील हैरान असतं. नेमका आकडा किती द्यायचा हा अंदाजच बांधता येत नाही.


कारण त्या त्या जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले भारिप बहुजन महासंघ, वंचीत बहुजन आघाडीच्या घटक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.त्यात कुणीही गडगंज संपत्तीचे मालक नाहीत.म्हणावी तशी कार्यकर्त्यांची कुमकही नाही. इतर राजकीय पक्षा प्रमाणे पुरविली जाणारी रसद नाही, कुणीही स्पॉन्सर नाही.कुठेही पावती पुस्तकं नाही, वर्गणी नाही.नियोजन आणि सभेची तयारी म्हणून विशेष काही दिसत नाही.राबणारे हात देखील लिमिटेड दिसतात.तरीदेखील सभेचे भले मोठे मैदानच बुक केले जाते.लोकवर्गणीतून उभा केलेला भव्य स्टेज आणि क्वालिटी साउंड सिस्टीम तसेच सभा लाईव्ह दिसावी म्हणून लावलेले स्क्रीन्स ह्या पलीकडे कोणताही तामझाम दिसत नाही.


वर्तमानपत्रात किंवा मीडियात जाहिराती नसतात.माणसं आणायला वाहनं व्यवस्था नसते, जेवणाची पाकीटं, बिसलेरी आणि मजुरी दिली जात नाही, मैदानात बसायला खुर्च्या नाहीत की रखरखत्या उन्हात डोक्यावर मंडप नाही.तरीही तौबा गर्दी होते.शहर पूर्णवेळ जाम झालेलं असते.महिला पुरुष आणि युवक युवतींनी मैदानं ओव्हरफ्लो होतात.दुपारी २ पासून मैदान भरायला सुरुवात होते ते थेट रात्री सभा संपेपर्यंत कायम असते.प्रत्येक सभेला हा आकडा वाढतच आहे.त्या मुळे संघ भाजपासहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडकी भरली आहे.पूर्वी दखल न घेणा-या मिडीयाला आता ह्या सभा लाईव्ह करावं लागताहेत, कव्हर करावं लागते.सम्पूर्ण महाराष्ट्रात हाच पॅटर्न कायम झाला आहे.राज्यात सलग होत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीच्या सभांना जनप्रतिसादाचा आलेख वाढत गेलेला दिसतो.नव्या इतिहासाची नांदी ठरणा-या सभांच्या यशाचे गमक काय असावे? हा प्रश्न एकदाच उलगडून दाखवावा म्हणून केलेला लेखन प्रपंच.


इतिहासात प्रथमच ‘वंचित’ ह्या शब्दाची व्याख्या वंचीत समूहाच्या लक्षात आली आहे.आणि ह्या आत्मभानातूनच अनेक लहान लहान जाती समूहांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीत ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची कास धरली आहे.त्यामुळे आजवर सत्ताधारी म्हणून वावरलेल्या सर्व पक्षांनी आपला ‘वोटींग मशीन’ म्हणून कायम कसा वापरच केला आहे हे मांडलं जाऊ लागले आहे. ७० वर्षात आम्ही सत्ता आणि संपत्ती, संधी वंचित कसे राहिलो हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमूक्त, अल्पसंख्यांक समूहाला ह्या सभेच्या माध्यमातून पटायला लागले आहे.त्यातून दररोज अगदी लहान लहान समूहाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते ह्या लोकजागरात सहभागी व्हायला लागलेत.कुठलंही आर्थिकच पाठबळ नसलं तरी आपण हा लोकलढा उभा करू शकतो.यशस्वी करू शकतो, हे सभेगणिक सिद्ध व्हायला लागल्याने.कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्या मुळे ह्या सभा वंचीतांचा संवाद,वंचीतांचा हुंकार,वंचीत एल्गार, आणि वंचितांचा सत्ता संपादन निर्धार ह्या वेगवेगळ्या टायटलखाली गाजायला लागल्यात.


सभेच्या सुरुवातीला ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर अससोद्दीन ओवेसी ह्यांचेसह नेते मंडळींची एंट्री हा ग्रँड इव्हेंट ठरतो.पांढ-या एसयूव्ही मध्ये असलेले बाळासाहेब,त्यांचे पाठोपाठ आलेला गाड्यांचा काफिला, त्याला एस्कॉर्ट करणारे काळ्या कपड्यातील सोशल कमांडो, गाड्यापाठी उस्फुर्तपणे ध्वज घेऊन धावणारे तरुण आणि स्टेजवरून दिल्या जाणा-या घोषणांना तेवढाच बुलंद प्रतिसाद देणारा लाखोंचा समूह यामुळे सभेत जोश भरतो.अगदी रणमैदानावरील रणभेरी आणि युद्धाची सुरुवात वाटावी असा तो क्षण असतो.स्टेजवर बसलेल्या नेत्यांना बांधलेले विविध रंगांचे फेटे हे तमाम वंचितांचे सामाजिक प्रतिनिधीत्व करीत एक विशिष्ठ रंग आणि धर्माची मक्तेदारी आम्ही मोडून काढलीय हे दिमाखाने सांगत असतो. त्या स्टेजकडे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आणि संकल्पनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि रिपब्लीकन पक्ष प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.


त्या नंतर सभेला साज चढतो तो सभेतील वक्त्यांच्या पोटतिडकीने मांडलेल्या अभ्यासू व जोशपूर्ण भाषणांनी.त्यात देश, संविधान आणि सर्वहारा समूहाचा उत्थानाची भलावण केली जाते.सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार असतो.येथल्या व्यवस्थेला आपला वाटा मागण्याचा इशारा असतो.वंचीताच्या विविध घटकातील वक्ते त्यांच्या समूहाच्या वेदना मांडताना उपस्थितांच्या काळजाचा वेध घेत असतात.आमदार इम्तियाज जलील आणि खासदार ओवेसी ह्यांची उर्दू हिंदीतील फटकेबाजीने सभेचा नूर बदलून जातो.


सरतेशेवटी एड बाळासाहेब आंबेडकर आपली भूमिका मांडतात.अत्यंत संयमितपणे,अभ्यासपूर्ण भाषणातून आपण हा वंचितांचा लढा का उभा केलाय, तो कसा यशस्वी होणार, त्यासाठी काय पथ्य पाळली पाहिजे, सत्ताधारी होणे म्हणजे काय आणि सत्ता कशी मिळवायची हा मूलमंत्र ते सांगतात.सोबतच भाजप आणि संघ हा कसा विषमतावादी आहे, सनातनी आहे, देशातील मनुवादी व्यवस्थेने देशातील संविधान आणि संवैधानिक व्यवस्था कशी धोक्यात आली आहे.२०१९ लढा जिंकल्याशिवाय देशातील मनुवाद पराभूत होऊ शकत नाही.ही अभ्यासपूर्ण मांडणी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खरा चेहरा देखील जनतेसमोर आणतात.


बाळासाहेब बोलायला उभे राहिले की प्रचंड घोषणा व आतिषबाजी होऊन पिनड्रॉप सायलेन्स होतो.जसजसं भाषण पुढे जाते तसे टाळ्यांचा व घॊषणाचा आवाज व प्रतिसाद अधिक वाढतो.ते जेव्हा मोदी आणि संघाला आव्हान देतात तेंव्हा जनतेने अख्ख मैदान डोक्यावर घेतलेलं असते.”स्वतःचा मिडीया स्वतः उभा करा.माझा कार्यकर्ताच माझा मिडीया आहे”.ह्या त्यांचे आवाहनाला अनुसरून लाखोचा समूह स्वतः तल्लीन होऊन ऐकत असताना बाळासाहेबांचा मिडीया म्हणून आपल्या मोबाईलवर हे भाषण लाईव्ह करीत असतात.सोबत प्रबुद्ध भारत ची टीम देखील हे सर्व जनतेपर्यंत पोहचवीत असते.त्यातून इतर जिल्ह्यातील वंचीत समूह ऊर्जावंत होत जातो.


आपल्या जिल्ह्यात वंचीत बहुजन आघाडीची सभा कधी आहे, ह्याची माहिती होताच त्या त्या जिल्ह्यातील सामाजिक संघटना भारिप बमसं,एमआयएम, वंचीतचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीही सत्ताधारी होणार ह्या निर्धाराने कामाला लागतात.त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळतो तो महाराष्ट्रातील जनतेचा.हजारो वर्षे माणूसपण नाकारलेल्या आणि व्यस्थेने गुलाम केलेल्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार घेऊन वंचीत समूह सहभागी होत चाललेत.त्यांनी आता ऐक्य, युती, आघाडी ह्या शब्दांना कायमची मूठमाती दिली आहे.’बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ’ या निर्धाराने पेटून उठलेल्या समूहांनी ही आरपारची लढाई लढण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात आपली ताकद वंचीत बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी केल्याने ह्या विक्रमी सभा सलगपणे यशस्वी होत आहेत.लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक मध्ये ह्या सलग सुरु असलेल्या लाखोंच्या सभांची नोंद व्हावी असा प्रयत्न तर होणारच आहे.सोबतच देशाची सत्ता वंचितांची असावी हाच अंतिम लढा यशस्वी करण्याची लोकभावना बाळासाहेबांनी वंचीत समूहात पेरली.त्याच भावनेचे मूर्त रूप म्हणजे लाखोंच्या सभा आहेत.शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार, एड. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व,वंचीत समूहाची साथ, सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचे पाठबळ हेच सर्व ऐतिहासिक सभाच्या विक्रमी उपस्थितीच्या यशाचे गमक आहे.


ह्याचे रूपांतर वंचीत बहुजनांच्या सत्तेत झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.


-राजेंद्र पातोडे,अकोला

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

वंचितांना विनातारण कर्ज - सुमित वासनिक

केस कापणे हा नाभीकांचा व्यवसाय पण आज भारतात केस कापणाऱ्या ज्या सर्वात मोठ्या आणि महागड्या सलून आहेत त्यामध्ये एकही नाभिकाची सलून नाही.

चामड्याच्या आणि चपलांचा व्यवसाय करणाऱ्या चांभार समाजातील एकाही व्यक्तीचा मोठा चामड्याच्या व्यवसाय नाही, चप्पल आणि बूट बनविणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये एकही कंपनी चांभाराची नाही.

आपल्या हाताच्या जोराने लोखंडाला आकार देऊन आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोहार समाजातील एकही व्यक्ती लोखंडाच्या व्यवसायात पुढे येऊ दिला गेलेला नाही.

वंचित बहुजन असलेल्या असंख्य अलुतेदार बलुतेदार जातींवर मनूच्या व्यवस्थेने जन्मजात काही कामे लादली ,त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले. त्यासर्व जातींमधील लोक आपल्यावर लादण्यात आलेल्या  कामात निपुण झाली आहेत. आपल्या अंगी तयार झालेल्या या गुणांमुळे काही लोकांची कामे करून या जातींमधील लोक आपला उदरनिर्वाह चालवायचे. पण या जाती करीत असलेल्या कामांचे जेंव्हा व्यावसायिकरण झाले तेंव्हा या जातींना त्यांच्याच कामात पुढे जाण्यापासून थांबवण्यात आले. वर नाभिक, चांभार आणि लोहार जातींची उदाहरणे दिली आहेत त्यावरून आपण हे समजू शकतो. ज्यावेळी या जाती करीत असलेल्या कामांना व्यावसायिक रूप आले तेंव्हा सवर्ण जातींमधील लोकांनी या कामांची मोठमोठी उद्योगं सुरू केली आणि त्यातून भरमसाठ कमाई केलि. 

इथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अलुतेदार, बलुतेदार करीत असलेले काम येत नसतांनाही सवर्ण या कामांचे मोठमोठे उद्योग कसे उभे करू शकले? आणि ज्यांची ही कामे होती त्या वंचित जाती मागे का पडल्या? या वंचित अलुतेदार-बलुतेदार जाती म्हणजे गरीब लोक, यांच्याकडे आपला व्यवसाय वाढवायला पैसा नाही, भांडवल उभे करायला पैसे नाही. बँकेकडे तारण ठेवायला मालमत्ता नाही , विनातारण बँक कर्ज देत नाही. या कारणामुळे हा वंचित समाज व्ययसायात पुढे येऊ शकलेला नाही. त्याचवेळी हजारो वर्षे सत्ता, संपत्ती आणि शिक्षणावर ठाण मांडुन बसलेल्या सवर्णांनी वंचितांचा वाटा बळकावून जमा केलेल्या मालमत्तेच्या जोरावर मोठमोठे व्ययसाय उभारले, यासाठी बँकांनी यांना हवे तेवढे कर्ज सुद्धा दिले.

या वंचित अलुतेदार-बलुतेदार जातींनाही जर व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज मिळाले असतेतर आज या जातींमधील व्यक्ती सुद्धा नावाजलेल्या उद्योगपती तयार करू शकल्या असत्या पण या देशातील प्रस्थापित काँग्रेस आणि भाजप सारख्या पक्षांनी हे कधीही होऊ दिले नाही, या प्रस्थापित पक्षांनी सवर्णांचे हित जोपासण्यासाठी वंचितांवर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. व्ययसायात पुढे जाण्यात येणारी ही अडचण ओळखून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्व वंचित जातीसमूहांना व्यवसायासाठी विनातारण कर्ज देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

मित्रानो आपले प्रश्न ओळखा, ज्या गोष्टी आपला विकास होण्यापासून थांबवत आहेत त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढा. लक्षात ठेवा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही!

Friday, 22 March 2019

तुमचा मतदानाचा तो एक प्रामाणिक क्षण इतिहास घडवेल - मनोज नागोराव काळे

तुमचा मतदानाचा तो एक प्रामाणिक क्षण इतिहास घडवेल - 
मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009



 लोकशाही म्हणजे सर्वच भारतीय नागरिकांचे राज्य, म्हणजेच रयतेचे राज्य अर्थात आधुनिक शिवशाही, पन या रयतेच्या राज्याला काही पाताळतंत्री लोकांनी गेल्या ७० वर्षात खुप कल्पकतेने आपल्या कुटुंबापुरती मर्यादित करुन ठेवली, एकाच घरातील चार ते पाच लोक पिढ्यान पिढ्या खासदार, आमदार व मंत्री बनत राहीले, काहींना ते टिकवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांशी रोटी बेटी व्यवहार करावा लागला, यांनी तेही केले पन सत्ता आपल्या नातेवाईकांतच खेळत राहीली पाहीजे याची या लोकांनी काळजी घेतली, त्यामुळे लोकशाही ही कुटुंबशाही व घरानेशाही ने संपुर्ण गिळंकृत केल्याचे आपनास दिसते, पंडीत नेहरु पासुन राहुल प्रियंका पर्यंत त्यांनीच सत्ता भोगली, तसेच देशातील अनेक घराण्यांनी आपापल्या विभागातील सत्ता आपापपल्या नातेवाईकातच ठेवली, जनतेला मुर्ख बनवुन, साम,दाम,दंड,भेद या नीतिची वापर करुन लोकशाही ला संपवण्याचा घाट घातला गेला.

महाराष्ट्रात अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी या घरानेशाही ला उध्वस्त करुन लोकशाही वाचवण्याचे, पर्यायाने संविधान वाचवुन ती लोकशाही तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विडा उचलला आहे, लोकशाहीचे सामाजिकीकरन, सार्वत्रीकरन करुन वंचित बहुजन आघाडी ही घरानेशाहीतील लोकशाही आता सामान्य जनतेपर्यंत पोचवत आहे, महाराष्ट्रातील जनतेने या वंचित बहुजन आघाडीला डोक्यावर घेतले आहे हे आपन पहात आहोत.कोनकोनत्या नेत्यांचे आपसात काय नाते संबंध आहेत ही माहीत पुढे देत आहे.
मतदारांनो जरा खालील नात्या गोत्यांवर ( सोर्स - सोशल मीडिया) नजर टाका व विचार करा की तुम्हाला या लोकांनी आजवर किती फसवले की एकमोंकांचे राजकीय हे विरोधक आहेत, पन ते फक्त बनवाबनवी करुन सत्ता भोगत आलेत हे आता स्पष्ट झाले आहे.

शरद पवार व एनडी पाटील, शंकरराव मोहिते-पाटील - बाळासाहेब देसाई, दिलीप देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) - माजी राज्यमंत्री अजित घोरपडे (परस्परांचे साडू)

अजित पवार यांची पत्नी - खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे

जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे ( मेहुणे)

जयंत पाटील - शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू)

आमदार विलासराव शिंदे यांची बहीण - शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे

आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी - सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री सख्या बहिणी आहे.

प्रमोद महाजन - गोपीनाथ मुंडे = मेहुणे
प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ

शरद पवार - बाळासाहेब ठाकरे = व्याही
शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई; भाचा सदानंद सुळे यांच्या सौ.

सचिन पायलट - फारूक अब्दुल्ला = जावई
केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मीरच्या फारूक अब्दुल्ला यांचे जावई

कलमाडी - निंबाळकर राजघराणे = व्याही
निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई

शरद पवार - सुशीलकुमार शिंदे = साडू
शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे बहिणी-बहिणी

स्व. विलासराव देशमुख - डिसुझा / भागनानी /हुसैन = व्याही
विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.
जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी !

मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते. 

विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत. 
विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून. 

विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. 

चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून. 

पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते. 

शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे. 

कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले! 

दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे माजी आमदार मालोजीराव यांची पत्नी. 

राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे निंबाळकर यांची पत्नी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी. 

शरद पवार यांची एक मेहुणी नामजोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी. 

दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे माजी आमदार शिवेंदराजे यांची पत्नी. 

कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात. 

 बाळासाहेब थोरात आणि पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे. 

राजळे यांची आई ती थोरातांची बहीण. 

राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी. 

आमदार डॉ. सुधीर तांबे हे थोरातांचे मेव्हणे व राजळेंचे मावसे.

नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई. 

अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही खासदार निलेश राणे यांची पत्नी.

कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व नारायण राणे हे दोघे व्याही. 

जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.

ही काही नाते सोशल मीडियावरुन मिळाली आहेत, बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर याही पेक्षा खतरनाक राजकारन असते,अशा प्रकारे उमेदवार कोनत्याही पक्षाचा, कोनतीही निवडुन आला तरी मंत्रालय, लोकसभा, विधानसभा यांच्याच ताब्यात रहाते, हे कितीही भ्रष्टाचार केला तरी यांच्यावर काही कारवाई होत नाही.

सध्या वंचित बहुजन आघाडी ने या सर्व घरान्यांशी समोरासमोर लढा पुकारला आहे, बाळासाहेबांच्या या हिम्मतीची दाद द्यावी लागेल, आपन एखाद्या नेत्या विरुद्ध बोलायची आपली हिम्मत होत नसते पन यांच्या संपुर्ण कुटुंबशाहीलाच अाव्हान देऊन त्याला सुरुंग लावन्याचे शौर्याचे काम आद.बाळासाहेब आंबेडकरांनी केले आहे, जनतेने आता कचखाऊ भुमिका घेऊ नये, आता ही रात्रच नाही तर दिवसरही वैर्याचा आहे.

वरील घराण्यांसाठी आमचे आजोबा, आमचे बापजादे, व ाता आम्ही सतत मतदान करत आलो आहोत,  आपल्या मागील पिढ्यांनी ही घरानेशाही फोफावन्यात हातभार लावला असेल पन आपन ही घरानेशाही संपवुन लोकशाहीला मुक्त करायचे आहे.
आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने सुरु केलेला हा लःा स्वातंत्र्य युद्धा इतकाच महत्वाचा आहे.

70 वर्षात फक्त 169 घरात लोकशाही ला कैद केले होते तीला स्वतंत्र करुन सामान्य जनतेला लोकशाहीत समान स्थान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला यशस्वी करा, आपल्या पुढील पिढ्या सुरक्षित करा, नवा जन्म घेत असलेला हिटलर ला मातीत गाडा.

ब्रिटीशांपासुन स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपनास 150 वर्ष प्रदीर्घ संघर्ष करावा लागला होता पन या घरानेशाही ला कुटुंबशाहीतुन मुक्त करण्यासाठी तुमचा फक्त एक क्षण पाहीजे, पन तो प्रामाणिक असला पाहीजे, फक्त मतपेटीवर मतदान करताना लोकशाही, संविधान व मुक्तीदाते महामानव शिव,शाहु,फुले आंबेडकर यांच्याशी इमान राखुन वंचित बहुजन आघाडी चे बटन दाबा, आपन लोकशाही ला एका दिवसात मुक्त करुन घेऊ.
आपल्याकडे सच्चा, सक्षम,प्रगल्भ, विद्वान नेता आहे, आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपल्याकडे जागृत झालेले तरुण आहेत, आपल्याकडे स्वाभिमान आहे.

आपन हि लढाई जिंकनारच आहोत, आपला मतदान करतानाचा तो एक कृतज्ञ व प्रामाणिक क्षण या देशाचे भविष्य घडविणार आहे हे लक्षात ठेवा, आपला विजय निश्चित आहे. लोकशाही ला स्वतंत्र करायचे आहे, संविधानाला सुरक्षित करायचे आहे, स्वताला सुरक्षित करायचे आहे.
आता भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची

- मनोज नागोराव काळे 8169291009

( नात्या गोत्यांची यादी मागच्या वर्षी फेसबुक वर मिळाली होती, संकलन करणारांचे नाव माहीत नाही, तरी त्यांचे आभार) 

Sunday, 17 March 2019

चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की ! - भिमराव तायडे.

चित भी मेरी, पट भी मेरी और अंटी भी मेरे बाप की ! 

- भिमराव तायडे.

अशी गत सुप्रिम कोर्टाचे निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे यांनी वंचित बहुजन आघाडी बद्दल जे स्टेटमेंट दिले यावरुन वाटते. खरे तर ते दिशाभूल करणारे आहे।

एकतर ते वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील नसून त्यांनी vba ला पाठिंबा दिलेला होता. त्यांना जनता दल (एस) या पक्षाकडून लढायचे होते त्यास एड. प्रकाश आंबेडकर यांनी संमती दिली होती. पण कोळसे-पाटील हे जर कॉंग्रेस महाआघाडी झाली तरच ते निवडणूक लढवतील अशी त्यांनी आपली भूमिका सुध्दा मांडली होती. म्हणजेच त्यांनाही  VBA चा पाठिंबा होता, ते VBA मध्ये सामील नव्हते.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक फैरी झाल्यात. पण युती झाली नाही. याबद्दलची इत्तंभूत माहिती वाचकांना जाणीव असेलच. पुन्हा नव्याने या ठिकाणी मांडत नाही.

इकडे कोळसे-पाटील यांचे दोन्ही कॉंग्रेसशी स्वतःचे बोलणे सुरुच होते व एड प्रकाश आंबेडकर यांना युती होणे किती जरुरी आहे अशी त्यांची बतावणी सुध्दा सुरु होती.

अखेर युती झाली नाही, म्हणून औरंगाबादच्या एका जागेसाठी तरी दोन्ही कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केल्यावरही ती कॉंग्रेस कडून नाकारल्या गेली. त्यांना खात्री होती की, जनता दल (एस) ची युती कर्नाटक मध्ये कॉंग्रेसशी असल्याने कॉंग्रेस त्यांना पाठिंबा देईल, पण सगळं मुसळ केरात !

एड प्रकाश आंबेडकर यांनी केवळ 4/5 जागांवर महाआघाडीत समझोता करुन युती करावयास पाहीजे होती असे कोळसे-पाटील यांची आग्रहाची भूमिका होती.

तर, एकून असे प्रकरण होउन बी जी कोळसे-पाटील यांची माघार झालेली आहे. यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना तिकीट नाकारण्यात कोणतीही कारवाई झालेली नाही.

आता प्रश्न असा आहे की, निव्रुत्त न्यायाधीश बी जी कोळसे-पाटील कोणती भूमिका घेतात ते ?

 का ते कॉंग्रेस/ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार आहेत का ? 

त्यांची शरद पवार यांचेशी एव्हढी जवळीक कशी ?

ते वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करणार नाहीत का ? 

त्यांना सॉफ्ट हिंदुत्ववाली कॉंग्रेस जवळची का वाटते ?

जशी कोळसे-पाटील यांची RSS बद्दल विरोधी भूमिका आहे तशी दोन्ही कॉंग्रेसची का नाही ? तरीही कॉंग्रेसला समर्थन का ?

-भीमराव तायडे, 9420452123

 नांदुरा (जि: बुलडाणा - 443404)

Friday, 15 March 2019

वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय.. -राजेंद्र पातोडे

वचितांचा नविन 'ट्रेंड सेट' झालाय.. 

-राजेंद्र पातोडे

वंचीत हा शब्द तसा लौकिकार्थाने "डिप्रेस क्लास" चे मराठी भाषांतर.डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी हाच शब्द इथल्या शोषित पिडीत सर्वहारा समुहासाठी वापरला होता.मात्र कालांतराने त्याला 'दलित' किंवा 'पददलित' ठरवुन त्याची लढण्याची उर्मी घालविण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कालानुरूप त्यांच्या संस्था संघटना आणि पक्षाचे नाव बदलविताना काळाची मुस बदलून टाकली होती.

 अगदी तोच ट्रेंड आता एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी सेट केला आहे.वंचित म्हणजे सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक अश्या सर्व बहुजनांच्या वर्जमुठीला एक व्यापक आकार दिला आहे.त्याला महाराष्ट्रभर मिळणारा प्रतिसाद हा चर्चेचा विषय न ठरता तर नवलच होते.

वंचितच्या सभांना अभूतपूर्व गर्दी असली तरी ती मतदानात रूपांतर होईल का असा एक बुरसटलेला सवाल सोयीने चर्चेत आणला गेला.परन्तु ही गर्दी नुसते भाषणं ऐकायला आलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भरउन्हात दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत तप्त मैदानावर बसलेला हा समूह पहिल्यांदा काही तरी ठरवून आलेला आहे.नाही तर नुसते भाषण ऐकायचे असते तर लाईव्ह होणाऱ्या सभा चॅनेल वर आणि मोबाईलवर अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतात.हा नवा बदल कुणी समजून घेत असेल तर तो फक्त वंचित समूह आहे.

त्या नंतर नवा ट्रेंड साहेबांनी सेट केलाय, तो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुजोर आणि आश्रित बनविणाऱ्या राजकीय समझोता आम्हाला मान्य नसेल हे ठणकावून सांगितले गेले. एक जागा घ्या आणि बदल्यात सर्व आंबेडकरी बहुजन मतदान काँग्रेसचे ही सौदेबाजी मोडीत काढली.तुम्ही आम्हाला जागा देणारे कोण हा प्रश्न विचारला गेला.

आघाडी करायची असेल तर ती 'रामदासी अग्रीमेंट' नसेल. स्वाभिमान आणि समान वागणूक दिली पाहिजे हे ठासून सांगितले गेले.त्यासाठी सहा महिन्याआधी आघाडी साठी काँग्रेस कडे प्रस्ताव पाठविला गेला.

शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीसाठी झुलवायचे आणि शेवटच्या क्षणी बाद करायचं हा काँग्रेसी खेळ ह्या वेळी मोडून काढला गेला.

तिसरा ट्रेंड सेट झाला तो मीडिया बाबत.ह्या आधी निवडणूक जाहीर झाल्या झाल्या आंबेडकरी पक्ष हे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडीया मधून बेदखल असायचे.त्यांचे अस्तित्वच नसल्या प्रमाणे निवडणूक काळात सैराट झालेला मीडिया वागत असे.जाहिराती आणि पेडन्यूज असतील तर कव्हरेज मिळेल. हा ट्रेंड देखील ह्या वेळी मोडीत निघाला आहे.

वंचित आघाडीचे प्रणेते एड बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात, कुठली भूमिका घेतात ही मिडीया मध्ये लीड न्यूज असते. किंवा ब्रेकिंग न्यूज असते.सलग तीन दिवसांत तीन पत्रकार परिषद घेतल्या तरी त्या प्रेस साठी पत्रकार मंडळी गर्दी करतात हे दुर्मिळ चित्र आज बाळासाहेबांनी बदलेले आहे.

अधिक एक महत्त्वाचा ट्रेंड जो सेट होणार आहे तो म्हणजे येतील वंचीत समुहाला प्रथमच आपल्या अल्पसंख्या प्लस केली की  विजय हमखास आहे हे पटणार आहे.सत्ता आणि संधी वंचित असलेल्या अठरा पगड जाती ,अलुतेदार बलुतेदार,आदिवासी, अल्पसंख्याक लहान लहान समूहाची बेरीज ही ४०% होते.आणि एकमेकाला मदत आणि मतदान केले की तेच विंनिंग कॉम्बिनेशन ठरते.२९% मतावर भाजप देशाची सत्ता मिळवते तर ४०% वंचित सहज सत्ताधीश होऊ शकतात.हा नवा फंडा ह्या वेळी असणार आहे.

हे सर्व ट्रेंड सर्वात आधी थोरल्या पवारांनी ओळ्खले आणि निवडणुकीतून माघार घेतली आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांना हे उमगले आहे त्या मुळे वंचित सुनामीत आपल्या राजकीय कारकिर्दीची वाट लागणार हे ओळखून अनेकांनी लढायलाच नकार दिला आहे. किंवा आपल्या चिल्यापिल्याना भाजप सेनेच्या सेवेत रुजू केले आहे. ही राजकीय  दहशत ह्या पूर्वी फक्त शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये होती ती बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी परत आणली आहे.

२०१९ ची निवडणूक त्या अर्थाने "डिप्रेस क्लासेस" अर्थात "वंचित बहुजनांच्या" राजकीय शक्तीच्या उदयाने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षाचे भवितव्य बिघडविल्या शिवाय राहणार नाही ह्यात शंकाच नाही


राजेंद्र पातोडे

प्रदेश प्रवक्ता

भारिप बहुजन महासंघ 

वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश

9422160101

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...