!!! नामांतर आणि बाळासाहेब आंबेडकर !!!
बाळासाहेब आंबेडकर यांनी नामांतर प्रश्नाला प्राधान्य दिले नाही असा गैरसमज काही लोकांनी करून दिला होता परंतु त्यांच्या या पायी मोर्चाने कळेल कि त्यांनी नामांतराला प्राधान्य दिले होते .दि .२७ नोव्हेंबर १९८३ ला मुंबईतील सिद्धार्थ विहार वडाळा येथे समविचारी लोकांची एक बैठक घेतली व रिपब्लिकन पक्षाबद्दल सविस्तर चर्चा केली .या चर्चेच्या आधारेच पुणे येथे ५ व ६ मे १९८४ ला अधिवेशन घेतले .”अहिल्याश्रम “ येथे घेतलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष्या होत्या गीताबाई गायकवाड .या अधिवेशनाला रा .सु .गवई वा तत्सम नेत्यांना बोलावले नाही .
कारण हे सगळे नेते पराभूत मानसिकतेत होते आणि ही पराभूत मानसिकता १९७८ साली समंत झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी होत नाही यात अंतर्भूत होती .या अधिवेशनातील बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरविणारे भाषण देण्याचा मोह आवरता येत नाही .ते आपल्या भाषणात म्हणाले होते की ,”डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा आपण निर्धार करत आहोत .या देशातील राजकारणावर संरजामदार श्रीमंताची घट्ट पकड आहे .येथे दलित श्रमिकांना कोणतेही राजकीय अस्तित्व नाही .या बहुसंख्यान्काची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करीत आहोत .सध्याचे एकजातीचे राजकारण ठोकरून आपण सर्वसमावेशक वृत्तीने सर्व तळागळातील समाज व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेऊन केवळ मी पणाची वल्गना न करता पोलादी वृत्तीने सत्ताच ताब्यात घेण्यासाठी लढून या देशातील सर्व राष्ट्रीय प्रश्नाकडे देश हिताच्या दृष्टीने पाहून देशाचे नेतृत्व निर्माण करणारा पक्ष निर्माण करत आहोत .(अर्जुन डांगळे ,सा .प्रबुद्ध भारत २८ ऑक्टोंबर १९८८ पु १३ ).
सर्व तळागळातील समाज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सोबत घेतल्याशिवाय नामांतराचा प्रश्न सुटणार नाही हे त्यांनी जाणले होते .याच काळात मंडल आयोग स्वीकृत करण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान व्ही .पी .सिंग यांनी केले होते .मंडल आयोगातील अनेक जातींना राजकीय भान देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले .हा ओबीसी समूह बहुसंख्याक असूनही तो राजकीय सत्तेपासून दूर असल्याचे व त्याचा उपयोग कॉंग्रेस चे मराठा राज्यकर्ते कसा करून घेत आहेत हे समजावून सांगितले .त्यासाठी बहुजनांमध्ये विश्वसर्ह्यता निर्माण केली .काही ठिकाणी माधव ना (मा- माळी , ध – धनगर , व – वंजारी )जवळ करीत त्यांच्यातील राजकीय इर्षा जागृत केली .इतकेच नव्हे तर ओबीसी मधील छोट्या जात समूहांना एकत्र करून सत्ता दिली .पंचायत समिती ,जिल्हा परिषद ही सत्ताकेंद्रे ओबीसी ना मिळवून दिली .अल्पसंख्याकत्वामुळे जे पंचायत समितीतही पोहचू शकत नव्हते त्यांना मंत्री केले .महाराष्ट्रातील राजकारण कूस बदलू लागले केवळ राजकारण नाही तर समाजकारण ही कूस बदलू लागले .मंडल आयोगाच्या निमित्ताने का होईना ओबीसी वर्ग बाळासाहेबांकडे आकृष्ट झाल्यावर बाळासाहेबांनी नामांतराचा प्रश्न हाती घेतला .मला येथे बाळासाहेबांच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा नाही तर नामांतरासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करताना एक बदल नोंदविणे महत्वाचे वाटते आणि ते म्हणजे १९७८ साली जे हात दलितांवर दगड फेकीत होते वा ते हात बाबासाहेबांचे फोटो फाडीत होते तेच हात आता जयभीम बोलू लागले होते .त्यांच्यातील जातीय पीळ नष्ट झाली होती .क्रांती म्हणतात ती हीच ! सामाजिक बदलाला महत्व देणारे बाळासाहेब निवडणुकींचेही राजकारणही करीत होते .१९८६ च्या विधानसभा निवडणुकीत भारीप ने जो जाहीरनामा काढला होता त्यात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला अग्रक्रम दिला होता .(भारिप बहुजन महासंघाची भूमिका पु १११ ).
बाळसाहेब केवळ जाहिरनाम्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे कृती कार्यक्रमासही लागले .त्यांनी ११ जानेवारी १९८६ रोजी राज्यविधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे प्रचंड मोर्चा नेण्यात आला .
दि .२ मे १९८६ या एकाच दिवशी भारिप च्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेऊन नामांतराची अंमलबजावणी करावी म्हणून निवेदन देण्यात आले . दि .१५ व १६ मे १९८६ रोजी औरंगाबाद येथील नेहरू भवन येथे दुष्काळ परिषद घेतली होती .या परिषदेत नामांतराच्या अंमलबजावणीवर दीर्घ चर्चा झाली व सरकारला निवेदन देण्यात आले . २७ जुलै १९७७ रोजी औरंगाबादेत adv बि .एच .गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाने वातावरण निर्मिती केली .दि .२७ जुलै १९८८ ला नामांतर ठरावाला एक दशक झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात आला .या मोर्चात सुमारे २५ हजार लोक सहभागी झाले होते .काहीसा मागे पडलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला .दि १० ऑगष्ट १९८८ रोजी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे बाळासाहेबांचे नामांतर या विषयावर व्याख्यान झाले त्यात ते म्हणाले होते कि ,मराठवाडा नामांतराच्या चळवळीमागील सामाजिक आशय बाजूला सारून निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून हा विषय हाताळला जात आहे .मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर करून टाकावे ,कारण ते स्वतःला नामांतरवादी समजतात .शिवसेनेसारख्या संघटनेच्या भीतीने नामांतर प्रश्न चिघळत गेल्यामुळे हा प्रश्न सावधानतेने हाताळला जावा.(प्रबुद्ध भारत २७ .८ .१९८८ पृ २ )
१९७८ नंतर झालेला उद्रेक १९७९ चा सत्याग्रह ,लॉंग मार्च याचा परिणाम झालाच पण त्याच काळात माझी पोष्टर कविता मुळे तरुणाची मुठी वळवल्या होत्या ती कविता अशी होती
..............रक्ताची माणस
चला तर म्यानातील तलवारी आता बाहेर काढा
भिंतीभिंतीवरील बंदुकांचे चाप पुन्हा एकदा चाचपून पहा
कशाला ऐकता बक्कास त्यांची :
“टाइम इज नॉट राईट फॉर रिव्हाल्युशन
बुडाखाली शेव्हरलेट अन आकाशाला कवेत घेणार छप्पर
यांचा उपभोग घेत घेत ते उद्याच्या क्रांतीचा जयजयकार करणार
शस्त्र हातात घेण्याची वेळ येताच
खोट लावून दूर पळणार
पहा माझ्या डोळ्यातून :तो जनसमुदाय तुमच्याच रोखाणे झेपावतोय
.............................................................................. ज.वि .पवार
अशाप्रकारची कविता भीत्तीचीतावर लावलेली होती त्याला काढून टाकण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते .परंतु तरुणांच्या मनात पेटलेली कवित विझणार नव्हती .
मास मोव्हमेंट ,भारतिय रिपब्लिकन पक्ष ,दलित मुक्ती सेना इ .संघटना नामांतरासाठी आग्रह धरीत होत्याच भारतीय दलित पंथर चे नेते रामदास आठवले सत्तेत गेल्यामुळे त्यांनी लढा खंडित केला होता .दलित पंथर चे काही गट आपापले अस्तित्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते .अशा वेळी गंगाधर गाडे यांचा एक गट एकाएकी चर्चेत आला कारण मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी गौतम वाघमारे यांनी २५ /११/१९९३ रोजी नांदेड येथे आत्मदहन केले .या दहनामुळे आंबेडकरी समाजात जसा उद्रेक झाला तसा शासनालाही धक्का बसला .आपण नामांतरासाठी बलिदान करीत आहोत असे वाघमारे यांनी लिहून ठेवले होते व त्याचवेळी माझे नेते गंगाधर गाडे आल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी अपेक्षा केली होती .गाडे यांना तातडीने नांदेड ला जावे लागले.पुन्हा एकदा वातावरण तप्त झाले . त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह राजा ढाले ,अविनाश महातेकर इ मध्ये बैठक झाली .शरद पवार बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणाले कि मी नामांतराबाबत मी निर्णय घेईल पण याचे श्रेयही मीच घेईल .त्यांनतर १४ जानेवारी १९९४ रोजी नामांतर झाले असे जाहीर केले परंतु ते नामांतर नव्हते ,नामविस्तार ही नव्हता आणि तरीही मुख्यमंत्री शरद पवार यांनी बंदुकीचा धाक नामांतरवाद्यांना दाखविला होता तसा सौम्य नामांतरविरोधकांनाही दाखविला होता .
नामांतर गपचूप मान्य करा हा दलितेतर संदेश देण्यात आला तर ही तडजोड मान्य करा अन्यथा सरकार शस्त्र हाती घेईल १४ जानेवारी १९९४ रोजी झाले ते नामांतर होते असे समजून हा दिवस औरंगाबादेत आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .पण हे लोक विसरतात कि आभाळभर उंची असलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाला एका प्रदेशापुरते बंधिस्त करण्यात आले ...........
संदर्भ – आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड ५ मधील उतारा
लेखक – ज .वि पवार
No comments:
Post a Comment