Sunday, 7 April 2019

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? - सुमित वासनिक

प्रस्थापितांना वंचित बहुजन आघाडीची एवढी धास्ती का वाटते? -  सुमित वासनिक

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ओबीसी, भटक्या आणि इतर अनेक जाती सोबत आल्या आहेत. हजारो वर्षे आपले शोषण झाल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही प्रस्थापित पक्षांनी आपले शोषण संपविले नाही, उलट आपल्या मतांवर निवडून येऊन प्रस्थापित पक्षांनीही आपले शोषणच केले आहे अशी भावना आता या सर्व वंचित जातींमध्ये वाढीस लागलेली आहे. सत्तेतील आपला वाटा मिळावा, आपल्यालाही प्रतिनिधित्व मिळावं या हेतूने हे सर्व जातीसमूह एक झालेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर प्रस्थापितांसमोर दंड थोपटून उभे झालेत.

वंचित बहुजन आघाडीच्या या झंझावाताला पूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आघाडीला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शीवसेना या पक्षांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काही पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकणे सुरू केलेले आहे. यासर्वांचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या एकाही उमेदवारास विजयी न होऊ देणे. या लोकांनि वंचित बहुजन आघाडीचा एवढा धसका का घेतला आहे? ज्यांना हजारो वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे त्यांच्यापैकी एकही जण संसदेत पोहचावा असे यांना का वाटत नाही? हे वंचितांचा विरोध का करतायत?

 वरील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आल्यावर राजकारणात  काय फरक पडेल हे समजून घेतले पाहिजे. आघाडीच्या जागा निवडून आल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील वंचित जातींमध्ये एक विश्वास निर्माण होईल तो म्हणजे आपल्या सारख्या वंचित जातींनी मिळून प्रस्थापितांना आव्हान दिल्यास आपण या प्रस्थापितांना हरवू शकतो. आपल्या जवळ कोणतेही  संसाधन नसलेतरि, पैसे नसलेतरी आपण या जातीयवादी धनदांडग्यांना हरवून सत्ता मिळवू शकतो. हा विश्वास , ही भावना एकदा का वंचितांच्या डोक्यात घट्ट बसली की देशातील सर्व वंचित आपआपल्या राज्यात एक होतील आणि महाराष्ट्रा प्रमाणे प्रस्थापितांच्या समोर आव्हान उभे करतील. वंचितांच्या एकत्र शक्तीने प्रत्येक राज्यात प्रस्थापितांची सत्ता , प्रस्थापितांचे वर्चस्व संपुष्टात येईल. यासोबतच फक्त लोकसहभागाने कमी पैश्यात निवडणुका जिंकता येतात हे सुद्धा समाजमनावर आपोआप बिंबविले जाईल, यामुळे भारतातील निवडणुकांना धनदांडग्यांच्या कचाट्यातून मुक्तता मिळेल. पैश्या अभावी निवडणुकांपासून दूर राहणारे वंचित आत्मविश्वासाने निवडणुका लढवायला लागतील. एकदा का हा बदल झाला की भारतातील राजकारणावर असलेली सवर्णांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल आणि पूर्ण देशात वंचितांच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल. प्रस्थापित पक्षांना नेमके हेच नको आहे. 

महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही जागा निवडून आल्यास  महाराष्ट्रातील वंचित जातींमध्ये जो आत्मविश्वास आणि सत्तेची ओढ निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेला आघाडीच्या कमीतकमी 60-70 जागा स्वबळावर निवडून येतील. वंचित बहुजन आघाडीच्या 50च्या वर जागा निवडून आल्यातर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वंचित समूहातून असेल. प्रस्थापित पक्षांना याच बदलाची धास्ती लागलेली आहे. याच कारणातून काँग्रेसने वंचितांसोबत युति केली नाही, याच कारणाने वंचित बहुजन आघाडिला बदनाम करायचा प्रयत्न केल्या जात आहे. 

वंचित बहुजन आघाडिला मिळत असलेला अतिप्रचंड पाठिंबा पाहून देशातील अनेक राज्यांमधून ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना वंचितांचा हा पॅटर्न त्यांच्या राज्यातही राबविण्यासाठी बोलविणे सुरू झाले आहे , यावरूनच लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडी देशातील राजकारणात वंचितांचे स्थान निर्माण करणार आहे याची चाहूल प्रस्थापितांना लागलेली आहे. त्यामुळेच प्रस्थापित आणि त्यांचे दलाल असलेले पुरोगामी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बिथरले आहेत. मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या जागा निवडून आणा आणि या बिथरलेल्या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या. तुम्ही दिलेलं मत हे वंचित समूहांच्या येणाऱ्या पिढ्यांचे वंचितपण दूर करेल हे लक्षात ठेवा.

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...