ऍड.बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम उमेदवार का देते?
- सुमित वासनिक
1983-84 साली ऍड.बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यातून निवडणूक लढले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि बाळासाहेब आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती. ऍड.बाळासाहेब आंबेडकर निवडून येतात अशी परिस्थिती होती. त्यावेळी काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बाळासाहेबांच्या विरोधात जातीयवादी प्रचार केला. आंबेडकर निवडून आले तर शेगावच्या मंदिराजागी मस्जिद बांधतील अश्याप्रकारचा अपप्रचार करण्यात आला होता. या निवडणुकीत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचा फक्त दहा हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी बाळासाहेबांच्या विरोधात काँग्रेस कडुन एवढ्या हीन पातळीवरील अपप्रचार झाला नसता तर बाळासाहेब निवडून आले असते.
त्यानंतर 1989 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या. 1983 ते 1989 या मधातिल काळात बाळासाहेब शेतकरी, शेतमजूर, भूमी हीन, आदिवासी, ओबीसी आणि इतर सर्वच वंचित समूहांच्या महत्वाच्या प्रश्नांवर काम करत होते. त्यावेळीही या समूहांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी बाळासाहेब कार्यरत होते. येणाऱ्या निवडणुकीत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या या झंझावाता समोर आपला उमेदवार टिकणार नाही असे काँग्रेसला चांगल्या प्रकारे कळले होते म्हणून काहीही करून ऍड.बाळासाहेब आंबेडकर निवडून यायला नको यासाठी आपला उमेदवार पडला तरी चालेल ही भूमिका काँग्रेसने घेतली होती. फक्त बाळासाहेबांना पाडण्यासाठी 1989 मध्ये काँग्रेसने अझहर हुसेन हे मुस्लिम उमेदवार अकोल्यातून दिले होते. त्यावेळी बौद्ध, हिंदु आणि मुस्लिम अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसने या निवडणूकित मुस्लिम उमेदवार देऊन निवडणुकीला धार्मिक रंग दिला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला, अकोल्यातून पहिल्यांदा भाजपचा उमेदवार निवडून आला. अकोल्यात मुस्लिम उमेदवार देण्यामागे बाळासाहेबांना हरविण्यासोबतच बाळासाहेबांच्या सोबत असलेल्या बहुजन, आदिवासी, भटक्यांना आणि मुस्लिमांना दूर करणे हे सुद्धा महत्वाचे कारण होते. हिंदू वि बौद्ध विरुद्ध मुस्लिम असे ध्रुवीकरण करून बाळासाहेबांनी उभी केलेली वंचितांची ताकद संपविणे हा बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लीम उमेदवार देण्यामागील काँग्रेसचा हेतू होता. काँग्रेसच्या या जातीयवादी खेळी मुळेच अकोल्यात भाजप पक्षाला जम बसविता आला.
2014 च्या निवडणुकांमधे जिकडे तिकडे मोदी लाट असतांनाही अकोल्यातून ऍड.बाळासाहेब आंबेडकरच निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळीही काँग्रेसने भाजपला थांबविण्यापेक्षा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासच जास्त महत्त्व दिले. यासाठी काँग्रेसने 1989 प्रमाणे 2014 मध्ये सुद्धा अकोल्यातून मुस्लिम उमेदवार दिला. महाराष्ट्रातील इतर मुस्लिम बहुल मतदारसंघ सोडून जिथे हमखास पराभव होईल अश्या अकोल्याच्या जागेवरच महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम उमेदवार काँग्रेस तर्फे देण्यात आला. अकोला पॅटर्नच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ओबीसी, मुस्लिम व इतर वंचित अश्या सर्वच समूहांना सत्तेत पोहचविले होते, या समूहाचे बाळासाहेबांना असलेले समर्थन संपविण्यासाठी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार देऊन पुन्हा हिंदू विरुद्ध बौद्ध विरुद्ध मुस्लिम असा जातीय आणि धार्मिक रंग निवडणुकीला दिला. यावेळेही व्हायचा तोच परीणाम झाला, पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून आला. ज्यावेळी देशाला भाजप आणि मोदींपासून वाचवायचं राजकारण करायचं होतं त्यावेळी कॉंग्रेसने भाजप समर्थनाचे राजकारण केले.
आता 3-4 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका पुन्हा होणार आहेत. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडिला पुर्ण महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. भाजपच्या देशविघातक विळख्यातून देशाला वाचवण्याच्या उद्देशाने ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला युतिसाठि प्रस्ताव दिलेला आहे. पण बाळासाहेबांच्या मागे एकवटलेला वंचित , दलित, मुस्लिम समाज पाहून काँग्रेस पुन्हा एकदा बाळासाहेबांना रोखण्याच्या उद्देशाने अकोला मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. मुस्लिम उमेदवार देऊन निवडणुकीतील वातावरण बौद्ध विरुद्ध हिंदू विरुद्ध मुस्लिम असे करणे आणि त्यातून बाळासाहेबांनी वंचितांना सत्तेत नेण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत ते हाणून पाडणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट दिसत आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांना रोखून त्याआडून वंचित ,मुस्लिम समाजाला सत्तेत जाण्यापासून रोखण्याचे काँग्रेसचे हे कारस्थान आता सर्व वंचित, बहुजन, मुस्लिम जनतेने ओळखले पाहिजे आणि वंचितांना सत्तेत पोहचविण्यासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट केले पाहिजे.
सुमीत वासनिक
No comments:
Post a Comment